राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे थांबली
By Admin | Updated: August 20, 2015 00:32 IST2015-08-20T00:32:16+5:302015-08-20T00:32:16+5:30
खेडोपाड्यांसाठीच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र सरकारचे धोरण निश्चित नसल्याने राज्य शासनाने मागील दोन वर्षीच्या आराखड्यातील कोणतीही नवीन कामे सुरू

राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे थांबली
अरुण बारसकर, सोलापूर
खेडोपाड्यांसाठीच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांबाबत केंद्र सरकारचे धोरण निश्चित नसल्याने राज्य शासनाने मागील दोन वर्षीच्या आराखड्यातील कोणतीही नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश काढले आहेत. राज्यात पावसाने ओढ दिलेली असताना योजनांची कामेही सुरू करता येत नसल्याने टंचाईच्या तीव्रतेत भर पडली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योेजनेंतर्गत खेड्या-पाड्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे घेतली जातात. त्यासाठी दरवर्षी आराखडा तयार केला जातो व त्याला मंजुरी घेतली जाते. तशी मंजुरी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांनी घेतली आहे. २०१५-१६ या वर्षीचा आराखडा मंजूर असला तरी त्यातील नवीन कामे सुरू करु नयेत असा आदेश केंद्र सरकारने २९ जून रोजी काढला. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी राज्य शासनाने फेरआदेश काढून २०१५-१६ च्या आराखड्यातील कोणतेही नवीन काम सुरू करू, नये असे म्हटले आहे. नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश देत असताना भौतिकदृष्ट्या पूर्ण परंतु आर्थिकदृष्ट्या अपूर्ण असलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचेही या आदेशात म्हटले आहे. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी रखडलेल्या योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही म्हटले आहे.