अनधिकृत स्टॉलवर कारवाई
By Admin | Updated: September 6, 2016 01:04 IST2016-09-06T01:04:16+5:302016-09-06T01:04:16+5:30
गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर अनधिकृतपणे थाटण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार

अनधिकृत स्टॉलवर कारवाई
पुणे : गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर अनधिकृतपणे थाटण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने रस्त्यावर स्टॉल लावून गॅसचा वापर करून खाद्यपदार्थ तयार करणे देखावे पाहण्यासाठी फिरणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक असल्यामुळे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा निर्णय घेतला आहे.
अतिक्रमण विभागप्रमुख संध्या गागरे यांनी ही माहिती दिली. उत्सवकाळात गर्दीच्या रस्त्यांवर चौकात किंवा पदपथांवरच असे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात. त्यासाठी अधिकृतपणे परवानगी घेतली जात नाही. तिथे स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो. मागील वर्षी एका ठिकाणी गॅस गळती होऊन आग लागली होती, सुदैवाने काहीही दुर्घटना घडली नाही. त्यामुळेच या वेळी आधीपासूनच काळजी घेण्यात येत आहे, असे गागरे यांनी सांगितले.
या कारवाईसाठी चार स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला २ पोलीस निरीक्षक, ४ सहायक फौजदार व ४० पोलीस असतील. ते चार पथकांमध्ये विभागून काम करतील. शहराचे चार भाग तयार करून ते या चार पथकांना देण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळपासूनच या कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती गागरे यांनी दिली.
प्रामुख्याने गर्दीच्या रस्त्यांवर पादचारी आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या स्टॉलवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्सवकाळात अनेकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते.
त्यासाठी त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांकडून परवानगी दिली जाते. त्याचे नियम आहेत. अशी परवानगी असलेल्या व सर्व नियमांचे पालन करणाऱ्या स्टॉलवर कारवाई होणार नाही. त्यामुळे स्टॉल लावण्यापूर्वी संबंधितांनी क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी घ्यावी, असे गागरे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
>या कारवाईसाठी चार स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला २ पोलीस निरीक्षक, ४ सहायक फौजदार व ४० पोलीस असतील. ते चार पथकांमध्ये विभागून काम करतील. शहराचे चार भाग तयार करून ते या चार पथकांना देण्यात आले आहेत.
प्रामुख्याने गर्दीच्या रस्त्यांवर पादचारी आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या स्टॉलवर कारवाई होणार