तंबाखू खाणाऱ्यांवर कारवाई

By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:05+5:302016-06-07T07:43:05+5:30

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो.

Action on Tobacco Eaters | तंबाखू खाणाऱ्यांवर कारवाई

तंबाखू खाणाऱ्यांवर कारवाई


मुंबई: तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोगाचा धोका वाढतो. तंबाखूच्या व्यसनाचे गांभीर्य लक्षात घेत, जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून पश्चिम रेल्वेच्या आरपीएफने एक विशेष अभियान राबविले होते.
या महिनाभराच्या अभियानात १ हजार १६३ प्रवाशांना तंबाखूचे सेवन
करताना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून २०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली. या वसुलीतून परेला २ लाख ३२ हजार ६०० रुपयांची कमाई झाली.
या अभियानाचे उद्घाटन पश्चिम रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक एस.के. पाठक यांच्या हस्ते झाले. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, कोचिंग डेपो आणि ईएमयू कारशेड या ठिकाणी इंडियन डेंटल असोसिएशन, तसेच सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे मुखाच्या कर्करोग तपासणीचे शिबिर भरवण्यात आले होते.
मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय गाड्यांचे अनुरक्षण कर्मचारी, टीटीई, तसेच आरपीएफचे कॉन्स्टेबल अशा एकूण २२० कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवर तंबाखू सेवनविरोधात पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.
विशेष अभियान पश्चिम रेल्वेच्या मुंबई मंडळाचे रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये सर्वेक्षण करून तंबाखूच्या व्यसनी प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात आली.
मागील आठवड्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत १३८ प्रवाशांना आरपीएफच्या कारवाईला सामोरे जावे लागले. कारवाईदरम्यान त्यांच्याकडून २८ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
(प्रतिनिधी)
कलाकारांनी केली जनजागृती
‘व्यसनांच्या आहारी जाऊ नका, जिवाला धोका आहे’ असे संदेश जुही चावला, श्रद्धा कपूर, अभिनेता गोविंदा, शरमन जोशी यांनी रेकॉर्ड केले आहेत. रेल्वे स्थानके, उपनगरीय लोकलसेवा आणि राजधानी/शताब्दी गाड्यांत तंबाखू सेवनविरोधात उद्घोषणा वाजवण्यात आल्या.

Web Title: Action on Tobacco Eaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.