लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड- मीरा भाईंदर मधून जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्ग परिसरातील बियर बार हे चक्क पहाटेपर्यंत चालतात व त्यात मोठ्या संख्येने गर्दी आणि धुडगूस घातला जातो. पहाटेपर्यंत चालणारे बारकडे उत्पादन शुल्क, स्थानिक पोलिस व महापालिका कडून दुर्लक्ष केले जात असताना पोलीस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशाने मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने ५ बार वर गुन्हे दाखल केले आहेत.
दहिसर चेकनाका ते वरसावे नाका पर्यंतच्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर अनेक बार हे चक्क पहाटे पर्यंत चालतात. पहाटे पर्यंत चालणाऱ्या ह्या बार मुळे मद्यपींची बार व परिसरात रेलचेल असते. बार पहाटे पर्यंत चालतात म्हणून मीरा भाईंदर सह बाहेरून देखील लोकं मद्यपान आदीं साठी आवर्जून जातात.
मद्यपींसह उनाड, रात्रीचे नाहक भटकणारे आदींना ह्या बार मुळे रात्री भटकंती आणि नशापान करण्याची संधीच मिळते. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गुन्हे करणाऱ्या आरोपींचे देखील ह्यात फावते. त्यांना बार मुळे लपण्याची किंवा बिनधास्तपणे वावरण्याची संधी मिळते. बार मधील नशापान मधून भांडणे, वादच्या घटना घडतात. मद्यपान करून वाहने चालवली जातात जेणे करून अपघातांची भीती असते.
मीरा भाईंदर मध्ये रात्री ११ वाजल्या नंतर खाद्य पेयची हॉटेल, गाड्या आदी पोलीस बंद करायला लावतात. मात्र महामार्ग लगतच्या परिसरातील हे बार पहाटे पर्यंत मोकाट चालतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण असते. शिवाय राज्य उत्पादन शुल्क विभाग, महापालिका देखील ह्या पहाटे पर्यंतच्या बार चे परवाने रद्द करत नाहीत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या पहाटे पर्यंतचे चालणारे हे बार व त्यातून चालणारी वर्दळ आदी निदर्शनास आली. त्यांनी या प्रकरणी मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ला कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने बुधवारी काशिमीरा पोलिस ठाणे हद्दीतील नाईट मिटिंग (दिव्या ज्योत) बार, समाधान हॉटेल व चेरीश बार ॲन्ड रेस्टॉरंट वर तसेच काशिगाव पोलिस ठाणे हद्दीतील नीलकमल नाका येथील स्वागत बार ॲन्ड रेस्टॉरंट व काशिमीरा नाका येथील सारंग बार ॲन्ड रेस्टॉरंट ह्या ५ बार वर कारवाई केली. पहाटे ४ वाजे पर्यंत हे बार सुरु होते. या प्रकरणी काशिमीरा व काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.