भविष्य सांगणाऱ्यांवर कारवाई
By Admin | Updated: January 20, 2015 01:44 IST2015-01-20T01:44:50+5:302015-01-20T01:44:50+5:30
साईज्योती महिला बचत गटाच्या प्रदर्शनात भलाभल्यांचे भविष्य सांगणाऱ्या चौघांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी उचलबांगडी केली.

भविष्य सांगणाऱ्यांवर कारवाई
अहमदनगर : येथील जिल्हा परिषदेच्या साईज्योती महिला बचत गटाच्या प्रदर्शनात भलाभल्यांचे भविष्य सांगणाऱ्या चौघांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलिसांनी उचलबांगडी केली.
भविष्य सांगण्याचे काम यापुढे बंद करू, असे शपथपत्र लिहून दिल्यानंतर त्यांची मुक्तता केली आहे. प्रदर्शनातील त्यांचा स्टॉल बंद केला आहे. साईज्योती प्रदर्शनात गेल्या पाच-सहा वर्षांपासून बारामती येथील भविष्य सांगणारे स्टॉल लावत आहेत. लोकांचे मनोरंजन म्हणून त्यांनाही स्टॉल दिला जात असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला होता. सोमवारी दुपारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते महेश धनवट यांच्यासह पाच-सहा कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. पत्नी नांदत नाही, त्यामुळे घरात शांती नाही, असे त्यांनी भविष्यकारांना सांगितले. त्यावर कोर्ट-कचेरी करू नका. एक मोठी पूजा बांधल्यास शांतता लाभेल. पत्नी नांदायला येईल. त्यासाठी त्यांनी १०१ किलो तांदळासह लांबलचक किराणा यादी समोर ठेवली. तसेच एक हजार देऊन शनिचे यंत्र विकत घेण्यास सांगितले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तोफखाना पोलिसांकडे त्यांची तक्रार केली. त्यानुसार पंडित हरिभाऊ वायकर (रा. बारामती) यांच्यासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्यांनी गुन्हा दाखल न करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची मुक्तता केली. (प्रतिनिधी)