ठाणे : शिस्तप्रिय पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपामध्ये शनिवारी हाणामारी पाहायला मिळाली. पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला. भाजयुमोचे अध्यक्ष ऋषिकेश आंग्रे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्र मास इंदिरानगर आणि साठेनगरमधील काही पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करणार होते. त्यामुळे त्यांनी येथे हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ एकाचा पाय राजकिरण यादव (२४) या तरुणाच्या पायावर पडला आणि येथेच दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर, एका तरुणाने यादव याच्या डोक्यात हातातील कडे मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये यादव जखमी झाला असून त्याला सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे. मारहाण करणारा कोण होता, याची माहिती समजू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, अशा घटनांनी पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची प्रतिक्रीया ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यात भाजपाच्या कार्यक्रमात हाणामारी
By admin | Updated: July 31, 2016 03:14 IST