अवैध वाळूउपशावर कारवाई
By Admin | Updated: July 4, 2016 01:30 IST2016-07-04T01:30:07+5:302016-07-04T01:30:07+5:30
बारामती तालुक्यातील निंबूत येथील नीरा नदीपात्रातून अवैध वाळूउपशावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला.

अवैध वाळूउपशावर कारवाई
वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील निंबूत येथील नीरा नदीपात्रातून अवैध वाळूउपशावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी (दि. २) दुपारी पाच ट्रॅक्टर-ट्रेलरसह ताब्यात घेण्यात आले.
येथील नीरा नदीपात्रातून अवैध वाळूउपसा केला जात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. शनिवारी याची खातरजमा करण्यासाठी महसूल विभागाचे नायब तहसीलदार आर. सी. पाटील, मंडल अधिकारी महेश गायकवाड, तलाठी मधुकर खोमणे, एस. ए. जगताप, प्रवीण जोजारी, गजानन पारवी, अशोक कदम, रवींद्र कदम गेले. या वेळी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील माफियांनी बारामती हद्दीतून वाळूउपसा चालवल्याचे आढळून आले. यासाठी मशीनचा वापर केला जात होता. अधिकाऱ्यांनी हद्दीचा मुद्दा उपस्थित करून उपसा त्वरित थांबवला. उपशासाठी वापरण्यात आलेली सर्व यंत्रणा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली.
पाच ट्रॅक्टर-ट्रेलर लावलेल्या चाळणीसह ताब्यात घेतले. मशीन नदीपात्रातून बाहेर काढून पोलीस ठाण्यापर्यंत नेण्याची व्यवस्था नसल्याने त्यावरील क्रमांक घेतले आहेत. काढलेल्या वाळूच्या पंचनाम्याची प्रक्रिया सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी चारपर्यंत नदीपात्रात सुरू होती. ताब्यात घेतलेली वाहने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामधे लावली आहेत. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणतीही नोंद नाही. (वार्ताहर)