सानपाड्यातील इमारतीवर कारवाई
By Admin | Updated: June 8, 2016 02:03 IST2016-06-08T02:03:26+5:302016-06-08T02:03:26+5:30
सिडको व महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका चालविला आहे.

सानपाड्यातील इमारतीवर कारवाई
नवी मुंबई : सिडको व महापालिकेने अतिक्रमणांच्या विरोधात कारवाईचा धडाका चालविला आहे. मंगळवारी सानपाडा येथील एका चार मजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी करावे येथील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका आणि सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात संयुक्त मोहीम उघडली आहे. याअंतर्गत गेल्या महिनाभरात अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मंगळवारी सानपाडा सेक्टर ५ येथील चार मजली इमारतीवर बुलडोझर फिरविण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वीही या इमारतीवर कारवाई करण्यात आली होती. परंतु कारवाईनंतर पुन्हा बांधकाम करण्यात आले होते. त्यात अनेक कुटुंबे राहत होती. कारवाई दरम्यान रहिवाशांनी सर्व घरे रिकामी केली होती. त्यानंतर महापालिका आणि सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने कारवाई करून ही इमारत जमीनदोस्त केली. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बेकायदा इमारतींवर कारवाईची मोहीम सिडको व महानगरपालिकेकडून तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून रहिवासी चिंचेत आहेत.