अक्कू यादव हत्याप्रकरणातील १८ आरोपींची निर्दोष मुक्तता
By Admin | Updated: November 10, 2014 17:10 IST2014-11-10T17:07:50+5:302014-11-10T17:10:40+5:30
नागपूरमधील बहुचर्चित अक्कू यादव या गुंडाच्या हत्येप्रकरणी नागपूरमधील जिल्हा न्यायालयाने सर्व १८ आरोपींची सोमवारी निर्दोष मुक्तता केली.

अक्कू यादव हत्याप्रकरणातील १८ आरोपींची निर्दोष मुक्तता
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १० - नागपूरमधील बहुचर्चित अक्कू यादव हत्येप्रकरणी नागपूरमधील जिल्हा न्यायालयाने सर्व १८ आरोपींची सोमवारी निर्दोष मुक्तता केली. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
नागपूरमध्ये १३ ऑगस्ट २००४ मध्ये दगडी इमारतीतील न्यायालयाच्या आवारात कुख्यात गुंड अक्कू यादव याची संतप्त जमावाने हत्या केली होती. अक्कू हा कस्तुरबानगर परिसरातील कुख्यात गुंड होता. बलात्कार, छेडछाड, हत्या, दरोडा, घरफोडी, खंडणी अशा विविध गुन्ह्यांमध्ये अक्कू आरोपी होता. ऑगस्ट २००४ मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली व सुनावणीसाठी अक्कूला कोर्टात आणले असता संतप्त जमावाने पोलिसांच्या उपस्थितीतच अक्कूला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केली होती. जमावाने कायदा हातात घेऊन एका गुंडाला न्यायालयाच्या आवारातच ठार मारल्याने देशभरात हे हत्याप्रकरण चर्चेचा विषय ठरले होते. याप्रकरणामध्ये एकूण २१ आरोपी होते. मात्र त्यातील तिघांचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता.
सोमवारी नागपूरमधील जिल्हा न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला. सबळ पुराव्या अभावी १८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.