मिरजेत लॉजच्या झडतीत अमली पदार्थ जप्त
By Admin | Updated: December 26, 2014 02:05 IST2014-12-26T02:05:04+5:302014-12-26T02:05:04+5:30
रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या झडतीत दोन जोडप्यांजवळ अमलीपदार्थ सापडले

मिरजेत लॉजच्या झडतीत अमली पदार्थ जप्त
मिरज : रेल्वे स्थानकाजवळील एका लॉजच्या झडतीत दोन जोडप्यांजवळ अमलीपदार्थ सापडले. याप्रकरणी लॉजचालकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अद्याप याबाबत गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.
या लॉजवर मुक्काम केलेल्या जोडप्यांजवळ अमलीपदार्थ असल्याची माहिती खबऱ्यामार्फत गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती.
बुधवारी रात्री पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मुंबईतील दोन तरुण व दोन तरुणी सापडले. त्यापैकी दोन तरुणांनी अमलीपदार्थाचे सेवन केले होते. त्यांच्याकडे चरसही सापडले. अमली पदार्थ बाळगल्याबद्दल पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.
तसेच गुरुवारी दिवसभर लॉजचालकाची चौकशी सुरू होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा अद्याप दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वी याच लॉजवर
एका जोडप्याकडून पाच हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी एका हवालदारास निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. अमलीपदार्थाची नशा करणाऱ्या जोडप्यांनी लॉजमधून पलायन केल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)