क्रीमिलिअरचा प्रश्न महिनाभरात निकाली
By Admin | Updated: July 21, 2015 01:19 IST2015-07-21T01:19:41+5:302015-07-21T01:19:41+5:30
भटक्या विमुक्तांना क्रीमिलिअरमधून वगळण्याचा प्रश्न एका महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत दिले.

क्रीमिलिअरचा प्रश्न महिनाभरात निकाली
मुंबई : भटक्या विमुक्तांना क्रीमिलिअरमधून वगळण्याचा प्रश्न एका महिन्यात निकाली काढण्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत दिले.
काँग्रेस सदस्य हरिभाऊ राठोड यांनी भटक्या विमुक्तांना क्रीमिलिअरमधून वगळण्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित केला. त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री म्हणाले की, यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर विधी व न्याय तसेच सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होऊन निर्णय
घेण्यात येईल.
मात्र, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल १ नोव्हेंबर २०१४ रोजीच राज्य शासनास मिळाला असताना अद्याप निर्णय का झाला नाही, असा प्रश्न विरोधी सदस्यांनी उपस्थित केला. यावर, त्या वेळी राज्यात आचारसंहिता लागू असल्याने निर्णय झाला नाही. त्यामुळे यासंदर्भात अधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात या समाजातील संघटना तसेच विधिमंडळ सदस्यांची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.