आचार्य प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांचे निधन
By Admin | Updated: September 27, 2016 01:25 IST2016-09-27T01:25:33+5:302016-09-27T01:25:33+5:30
आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती.

आचार्य प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांचे निधन
मुंबई : आचार्य श्री प्रेमसूरीश्वरजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी जैन समाजातील पाच सदस्यांनी मिळून ११.११ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची बोली लावली होती. त्यांचे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. ते जैन धर्माच्या तपगच्छ शाखेचे प्रमुख होते. त्यांनी हजारो लोकांना दीक्षा दिली आहे.
जैन धर्मात महान संताच्या अंत्यविधीत सहभागी होणे हे सदस्यांसाठी सन्मानाचे समजले जाते. अंतिम संस्कारासाठी लावण्यात आलेल्या बोलीच्या रकमेतून प्राप्त झालेल्या निधीचा उपयोग धार्मिक आणि प्राणिमात्रांच्या हितासाठी करण्यात येतो.
आचार्य प्रेमसूरीश्वरजी यांच्या अंत्यविधीसाठीची बोली वाळकेश्वरच्या बाबू पन्नालाल जैन मंदिरात झाली. ही प्रक्रिया तीन तास चालली. एक प्रसिद्ध डॉक्टर, एक बिल्डर आणि तीन प्रसिद्ध व्यावसायिकांनी जैनाचार्य यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांची बोली लावली. खांदा देण्यासाठी प्रत्येकी २१ लाख रुपयांची बोली चार सदस्यांनी लावली. पालखीच्या चारही बाजूंना पाण्याने भरलेले पात्र ठेवण्यासाठी २१ लाखांची बोली लावण्यात आली होती. ११.११ कोटी रुपयांची बोली लावणाऱ्या जैन समाजातील पाचही सदस्यांनी मिळून काल दुपारी ४.३० वाजता जैन मुनींच्या पार्थिवाला अग्नी दिला.
जैन समाजाचे एक सदस्य गिरीश जैन यांच्यामते ज्या स्थळावर जैनाचार्यचे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिथे बोलीतून मिळालेल्या रकमेतून भव्य मंदिर बनविण्यात येणार आहे. अंत्यसंस्कार ह्युजेस रोडवरील पंचशिल प्लाझा बिल्डिंगच्या मागील मैदानावर करण्यात आले. त्यांना पूर्वी ब्रीच कॅन्डी रुग्णालय आणि शनिवारी रात्री सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवसेना तसेच भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तपगच्छाधिपती प्रेमसूरीश्वरजी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जगभरात १० लाख संदेश पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
रवींद्रसूरीजी म.सा. यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटींची बोली
जुलै महिन्यात जैनाचार्य श्रीमद्विजय रवींद्रसूरीजी महाराज यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यासाठी ७ कोटी रुपयांची सामुहिक बोली लावली होती. रवींद्रसूरीजी महाराज यांचे मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील राजगड येथे निधन झाले होते. अंत्यसंस्काराच्या २५ विधीसाठी वेगवेगळी बोली लावण्यात आली होती. खांदा देण्यासाठी ४ सदस्यांनी १.५७ कोटी रुपयांची बोली लावली होती. महाराजांचे पार्थिव चितेवर ठेवण्यासाठी ४१.४१ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.