आरोपींनी पोलिसांविरुद्ध वापरले आरटीआयचे अस्त्र

By Admin | Updated: September 14, 2015 02:58 IST2015-09-14T02:58:30+5:302015-09-14T02:58:30+5:30

७/११ मालिका बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या १२ जणांपैकी एहतेशाम सिद्दिकी याने तपशील देताना दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) नाकीनऊ आणले होते.

The accused used the rTI against the police | आरोपींनी पोलिसांविरुद्ध वापरले आरटीआयचे अस्त्र

आरोपींनी पोलिसांविरुद्ध वापरले आरटीआयचे अस्त्र

डिप्पी वांकाणी,मुंबई
७/११ मालिका बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या १२ जणांपैकी एहतेशाम सिद्दिकी याने तपशील देताना दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) नाकीनऊ आणले होते. इतकेच नव्हे, तर त्याने तपास करणाऱ्या पोलिसांविरुद्ध आरटीआयचा पुरेपूर वापर वा दुरुपयोगही केला. त्याने तुरुंगातून माहितीच्या अधिकारात शेकडो अर्ज केले. या अर्जांद्वारे त्याने तपास अधिकाऱ्यांपैकी कोणाविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला सुरू आहे का याची माहिती घेतली. वाहनांचे लॉगबुकमधील तपशीलही त्याने त्या अर्जांद्वारे मागविले होते. तुरुंगात असतानाही त्याने माहितीच्या अधिकारात शेकडो अर्ज करून १० हजार कागदपत्रांचा जोड असलेले ४५०० पुरावे गोळा केले होते.
एहतेशाम हा केमिकल इंजिनीअर व प्रकाशक. त्याने मीरा रोड येथे पेरून ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात ३९ जणांचा बळी गेला. त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारकरीत्या देण्यात आली व त्याच्या आरोपांना काही आधार राहिला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. एहतेशामची चौकशी करणाऱ्यांना त्याने त्याच्याविरुद्धचे अतिशय ठोस असे पुरावे समोर आणेपर्यंत कशाचाही थांगपत्ता लागू दिला नव्हता. एवढेच काय तो या खटल्याची चौकशी केलेल्या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ ला नागपाडातील नर्सिंग होमच्या बाजुला असलेला पीसीओ (टेलिफोन बूथ) दहशतवाद्यांचे मुख्य आदेश केंद्र (कमांड सेंटर) कसे बनले होते हे सांगितले. प्रत्यक्ष बाँबस्फोट घडवताना त्यांनी त्यांचे मोबाईल फोन मुद्दाम जवळ ठेवले नव्हते, हेही या अधिकाऱ्याने सांगितले. २००६ च्या आधीपासूनच सिद्दिकी ‘लष्कर ए तय्यबा’चे (एलईटी) सफदर नागोरी आणि आझम चीमा यांच्या विभागाच्या (मोड्यूल) संपर्कात होता. तो मध्य प्रदेशात जाऊन नागोरीला भेटला होता व त्याने स्फोटांत सहभागी व्हावे, असे त्याला पटविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, नागोरीने त्याला सांगितले की माझा विभाग (मोड्यूल) हा ठराविक लक्ष्यांनाच ठार मारत असतो. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर माणसे मारण्यास तयार झाला नाही. अगदी सुरवातीपासून सिद्दिकी हा त्याच्या भूमिकेच्या बारीकसारिक तपशिलाबद्दल अतिशय दक्ष असायचा. जेव्हा त्याला ‘तू पाकिस्तानात प्रशिक्षण घे’, असे विचारण्यात आल्यावर त्याने युएपीएअंतर्गत (बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा) अटक होईल या भीतीने जाणीवपूर्वक ते टाळले, असे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.
या दोषींनी त्यांच्या स्वत:च्या कॉल डाटा रेकॉर्डस्ची (सीडीआर) मागणी करून न्यायालयाची दिशाभूल करायचा केलेला प्रयत्न त्यांच्यावरच कसा उलटला हे सेवानिवृत्त सह पोलीस आयुक्त दिनेश अग्रवाल यांनी सांगितले. अग्रवाल म्हणाले की, त्यांनी (दोषी) उच्च न्यायालयात अर्ज करून आम्हाला आमच्या फोनचा सीडीआर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. बाँबस्फोट घडले तेव्हा ते त्या ठिकाणी नव्हतेच असा दावा त्यांनी केला होता. सीडीआर मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाने अधिकाऱ्याची नियुक्ती केली. हा सीडीआर आम्हालाही देण्यात आला. त्याचा आम्ही जेव्हा अभ्यास केला त्यातून नागपाडात फौजिया नर्सिंग होमच्या बाहेरील पीसीओ त्यांचे कमांड सेंटर कसे होते हे आढळले. दोषींपैकी एक डॉ. तन्वीर तेथे काम करायचा. बहुतेक सगळ््या आरोपींना आलेले आणि त्यांनी केलेले सगळे फोन कॉल्स त्या पीसीओच्या नंबरवर होते, असे आढळल्याचे अग्रवाल म्हणाले. पीसीओवर एखाद्याला फोन येऊ शकतात हे आम्ही समजू शकतो. परंतु आऊटगोर्इंग कॉल्सही त्याच नंबरवरून झालेले होते. या नंबरचा वापर त्यांनी त्यांचे कमांड सेंटर म्हणून केला तो पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी. शिवाय त्यांनी प्रत्यक्ष बाँबस्फोट घडविताना स्वत:सोबत आपापले मोबाईल फोन्स मुद्दाम ठेवले नव्हते, असे अग्रवाल यांनी सांगितले. तो त्याच्याविरुद्ध अतिशय ठोस असा पुरावा समोर मांडल्याशिवाय कधीही कुठल्याही गोष्टीला कबूल व्हायचा नाही. कधी तो आम्हाला मी कुठे व कसा बाँब ठेवला त्याची माहिती सांगण्यासाठी चर्चगेट स्टेशनसारख्या ठिकाणी न्यायचा. तेथे आम्ही गेल्यावर मात्र मला मारहाण होईल या भीतीतून मी ते खोटेच सांगितले, असे म्हणायचा, असे हा अधिकारी म्हणाला. मध्य प्रदेशला त्याने दिलेल्या भेटीबद्दल आम्ही विचारले असता सिद्दिकीने तो तेथे त्याच्या प्रकाशनाची पुस्तके विकायला गेलो होतो, असे सांगितले. त्याचा पुरावा दे असे म्हटल्यावर मी सगळी बिले फाडून टाकली, असे तो म्हणाला.

Web Title: The accused used the rTI against the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.