लैंगिक अत्याचारातील आरोपी महिन्याने जेरबंद

By Admin | Updated: September 22, 2016 03:32 IST2016-09-22T03:32:03+5:302016-09-22T03:32:03+5:30

दूरध्वनीच्या आधारे लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील फरारी आरोपी इम्रान चौधरी (२३) याला पकडण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे.

Accused in sexual assault month after month | लैंगिक अत्याचारातील आरोपी महिन्याने जेरबंद

लैंगिक अत्याचारातील आरोपी महिन्याने जेरबंद


ठाणे : ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या एका निनावी गोपनीय दूरध्वनीच्या आधारे लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील फरारी आरोपी इम्रान चौधरी (२३) याला पकडण्यात कळवा पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या एका चुकीमुळे तो पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. ठाणे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आरोपीची माहिती नियंत्रण कक्षाच्या एक शून्य शून्य या क्रमांकावर पोलीस हवालदार सुनीता शिंदे यांना २१ सप्टेंबर २०१६ रोजी मध्यरात्री १२.३० वा.च्या सुमारास एका दक्ष नागरिकाने दिली. कळवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद असलेला आरोपी भास्करनगर भागात वास्तव्यास असल्याचा पत्ताही या व्यक्तीने दिला. शिंदे यांनी या दूरध्वनीची गांभीर्याने दखल घेऊन कळवा पोलिसांना त्याबाबतची तत्काळ माहिती दिली. तिच्या आधारे कळवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तत्काळ भास्करनगर येथे जाऊन इम्रानला अटकही केली.
आलेल्या कॉल्सची गांभीर्याने दखल घेऊन एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या रात्रपाळी ड्युटीवरील हवालदार शिंदे यांच्यासह नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी आणि कळवा पोलिसांचे मुख्यालय पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)
>काय घडला प्रकार...
भास्करनगर भागात राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. मुलीला त्याने फूस लावल्याचे समजल्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला उत्तर प्रदेशातील बलिया गावी नातेवाइकांकडे पाठवले होते.
इम्रानने तिला तिथूनही पळवून आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच नालासोपाऱ्यातील एका घरातही त्याने तिला कोंडून ठेवले होते.
या घरातून तिने कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर, २७ आॅगस्ट २०१६ रोजी याप्रकरणी तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: Accused in sexual assault month after month