आरोपीच बनला भायखळा कारागृहातील कार्यक्रमाचा प्रायोजक
By Admin | Updated: March 1, 2017 06:06 IST2017-03-01T06:06:47+5:302017-03-01T06:06:47+5:30
कारागृहातील कडेकोट सुरक्षा भेदणे कुणालाही शक्य नसते

आरोपीच बनला भायखळा कारागृहातील कार्यक्रमाचा प्रायोजक
मनीषा म्हात्रे,
मुंबई- कारागृहातील कडेकोट सुरक्षा भेदणे कुणालाही शक्य नसते. मुंबईत मात्र चक्क एका आरोपीनेच कारागृह सुरक्षेच्या डोळ्यात धूळ फेकत कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचा घाट घातला. आणि पोलिसांसह कार्यक्रमांच्या आयोजकांना टोपी घालून पसार झाल्याची धक्कादायक बाब भायखळा कारागृहात घडल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. संदीप जाधव असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणी नागपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईसह राज्यभरातील कारागृहात कैद्यांच्या मनोरंजनासाठी प्रशासनाकडून तसेच संस्थांच्या मदतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी संबंधित आयोजक, प्रायोजकांची माहिती घेतली जाते. मात्र १४ एप्रिल रोजी भायखळा कारागृहात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संदीप जाधवने कार्यक्रम केला होता. गेल्या वर्षी तळोजा कारागृहात जाधवने कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तेथे भायखळा कारागृहातील काही अधिकारीही उपस्थित होते. त्या वेळेस त्यांची जाधवसोबत ओळख झाली. जाधवने भायखळा कारागृहातही काही कार्यक्रम घ्यावयाचे असल्याचे सांगितले. अधिकारीही त्याच्या बोलण्यात अडकले, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती न घेता त्यांनी १४ एप्रिलच्या कार्यक्रमाबाबत त्याला सांगितले.
त्यानुसार जाधवने शुभम क्रिएशन मुंबई या संस्थेच्या स्वरांजली आॅर्केस्ट्राचे महेश प्रसाद लिमये यांच्याशी १३ एप्रिल रोजी संपर्क साधला व त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली. लिमये यांनीदेखील त्यांना होकार दिला. दोन कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यात ८० हजार रुपयांत बोलणी झाली. लिमये यांनीही रातोरात टीम उभी केली, तेव्हा लिमये यांनी तेथील कारागह अधिकारीकडून जाधवच प्रायोजक असल्याची खातरजमा करून घेतली. प्रशासनाकडूनही त्याच्या बाजूने हिरवा कंदील मिळाल्याने त्यांनीही कार्यक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना १० हजार रुपये देण्यात आले व दोन्ही कार्यक्रम पार पडले. मात्र कार्यक्रमाच्या उर्वरित रकमेबाबत जाधवने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीचे काही दिवस चेकने पैसे दिले मात्र ते वटले नाहीत. लिमये यांनी कारागृह विभागाकडे धाव घेतली. तेथूनही त्यांना संपूर्ण नियोजन जाधवनेच केले असल्याची माहिती मिळाली. काही महिन्यांनंतर जाधव पसार झाला. अखेर यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्याविरुद्ध लेखी तक्रार दिल्याची माहिती लिमये यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जाधवने २००७ मध्ये रोहा येथे माईनिंग प्रोजेक्ट सुरू असल्याचे सांगून त्यात गुंतवणूक केल्यास २० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३६० जणांची फसवणूक केली. यामध्ये १४० पोलिसांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये तो तळोजा कारागृहात बंदीही होता, अशी माहिती समोर येते. संदीप जाधव याची शिवसेनेसह अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांबरोबर ऊठबस होती.
>दोघांचे व्यवहार परस्पर
तळोजा कारागृहात आयोजिलेल्या कार्यक्रमादरम्यान जाधवसोबत ओळख झाली. आमच्याकडे घेतलेल्या कार्यक्रमातील व्यवहार हा संस्था आणि त्याच्यात परस्पर झाला. आम्हाला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत माहिती नव्हते. त्याचा अहवालही आम्ही वरिष्ठांकडे पाठविला आहे. आम्ही स्वत:च्या खिशातून पैसे देण्याची तयारी दर्शविली असल्याची माहिती भायखळा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी दिली.
>हे तर नगर दिवाणी प्रकरण...
या प्रकरणी आरोपीने पार्ट पेमेंट केले आहे. त्यामुळे ते नगर दिवाणीमध्ये मोडत असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बसवत यांनी दिली.