बजोरिया कन्स्ट्रक्शनवर घोटाळ्याचा आरोप
By Admin | Updated: September 21, 2016 21:06 IST2016-09-21T21:06:13+5:302016-09-21T21:06:13+5:30
यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप बजोरिया हे संचालक असलेल्या बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने विविध सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचा

बजोरिया कन्स्ट्रक्शनवर घोटाळ्याचा आरोप
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २१ : यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य संदीप बजोरिया हे संचालक असलेल्या बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीने विविध सिंचन प्रकल्पांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
अतुल जगताप असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते कंत्राटदार आहेत. एका जनहित याचिकेत त्यांनी अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्पातील गैरव्यवहारावर प्रकाश टाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातील अर्थ वर्क सीसी लायनिंग व लेफ्ट बँक मेन कॅनलच्या बांधकामाचे कं त्राट बजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.
परंतु, कंपनीकडे अशा प्रकारची कामे करण्याची पात्रता नाही. कंपनीने खोटे व बनावट दस्तावेज सादर करून हे काम मिळविले आहे. कंपनीचे संचालक संदीप बजोरिया यांचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. कंपनीला हे कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. कंपनीने या कामासाठी शासनाकडून आगाऊ रक्कम घेतली आहे. परंतु, ही रक्कम या कामावर खर्च न करता विधान परिषदेच्या निवडणुकीत वापरण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे होते. परंतु, ५ वर्षाचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. परिणामी शेतकरी आजही पाण्याची प्रतीक्षाच करीत आहेत. कंपनीचा घोटाळे करण्यात हातखंडा आहे. यामुळे कंपनीविरुद्ध आतापर्यंत अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.