निवडणूक कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू झाल्याचा आरोप
By Admin | Updated: October 10, 2014 05:44 IST2014-10-10T05:44:38+5:302014-10-10T05:44:38+5:30
पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय सखाराम कोळी (४४) यांचा बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला.

निवडणूक कामाच्या ताणामुळे शिक्षकाचा मृत्यू झाल्याचा आरोप
जळगाव : शहरातील नित्यानंद नगरमधील रहिवासी आणि पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय सखाराम कोळी (४४) यांचा बुधवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हृदयविकाराने मृत्यू झाला.
निवडणुकीच्या अतिरिक्त कामामुळे कोळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मूळचे बोरनार येथील रहिवासी असलेले संजय कोळी यांची विधानसभा निवडणुकीसाठी पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथे बीएलओ (बुथ लेव्हल आॅफिसर) म्हणून नियुक्ती झाली होती. गावातील मतदारांना त्यांचे मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांकाची माहिती दर्शविणाऱ्या चिठ्ठ्या वितरणाचे काम त्यांच्याकडे होते.
बुधवारी त्यांच्या छातीत अचानक दुखू लागल्यानंतर त्यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक खराब झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे शोक कळा पसरली आहे. (प्रतिनिधी)