रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा
By Admin | Updated: June 6, 2015 01:39 IST2015-06-06T01:39:20+5:302015-06-06T01:39:20+5:30
तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा झाल्यानंतर शनिवारी तारखेनुसार ६ जून रोजी किल्ले रायगडावर ३४२ वा शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे.

रायगडावर आज तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा
महाड : तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा झाल्यानंतर शनिवारी तारखेनुसार ६ जून रोजी किल्ले रायगडावर ३४२ वा शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी दोन दिवसांपासूनच राज्यभरातून शिवभक्त रायगडकर दाखल झाले असून शिवछत्रपतींच्या जयघोषाने किल्ला दुमदुमला आहे. या सोहळ्यासाठी सुमारे पन्नास हजाराहून अधिक शिवभक्त गडावर उपस्थित राहणार आहेत.
कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणाऱ्या या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जि.प. अध्यक्ष सुरेश टोकरे, आ. पंडीत पाटील, आ. धैर्यशील पाटील, माजी आ. माणिक जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी कोल्हापूर हायकर्सची एक तुकडी जलकुंभासह गडावर दाखल झाली आहे तर शिवधनुष्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शिवनेरीहून पालखी घेऊन गडावर दाखल झाले आहेत. शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने सोहळ्यानिमित्त मेघडंबरीतील शिवछत्रपतींचा पुतळा, होळीच्या माळावरील शिर्काई मंदिराबरोबरच गडाची स्वच्छता करण्यात आली.
६ जून रोजी पहाटे ५.३० वा. ध्वजारोहणाने कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून स. १० वा मुख्य राज्याभिषेक दिन सोहळ्याला सुरुवात होईल. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक, छत्रपती राजघराण्याच्या राजपुरोहिताच्या मंत्रोच्चारात करण्यात येणार आहे. त्यानंतर राजसदरेवरून जगदीश्वर मंदिराकडे भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.