दुभाजकामुळेच घडतात अपघात
By Admin | Updated: July 4, 2016 03:49 IST2016-07-04T03:49:05+5:302016-07-04T03:49:05+5:30
भिवंडी वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे सुप्रीम कंपनीने रस्ता अरूंद असतानाही दुभाजक टाकल्याने आत्ता पर्यंत तेरा अपघात

दुभाजकामुळेच घडतात अपघात
वाडा : भिवंडी वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे सुप्रीम कंपनीने रस्ता अरूंद असतानाही दुभाजक टाकल्याने आत्ता पर्यंत तेरा अपघात झाल्याने वाहन चालक तीव्र संताप व्यक्त करीत असून हे दुभाजक काढावे किंवा येथील रस्ता तातडीने रूंद करावा अशी मागणी करीत आहेत. या दुभाजकामुळे दोन गाड्या एकाचवेळी पास होत असताना थोडे जरी जजमेंट चुकले तरी गाड्या दुभाजकाला लागून अपघात होत आहेत.
भिवंडी वाडा मनोर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर शासनाने सुप्रीम कंपनीला दिले आहे. या रस्त्यासाठी टोल आकारला जात असतांना सुद्धा रस्त्याचे काम ४० टक्के अपूर्ण आहे.
कुडूस नाका येथे सब वे असतांनासुध्दा गेल्या पाच वर्षांत येथे सब वे चे काम झाले नाही. उर्वरित रस्त्याचे काम ही निकृष्ट झाल्याने हा रस्ता खड्डे मय झाला असून टोल देऊनही वाहनचालकांना खड्डयातून प्रवास करावा लागतो.
कुडूस नाका येथे सब वे प्रस्तावित असतांनाही त्याचे काम केलेले नाही. आता पर्यंत येथे छोटया मोठया वाहनाचे १३ अपघात झाले असून त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच दुभाजकामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. (वार्ताहर)
>स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या असता बांधकाम विभागाने सुप्रीम कंपनीशी पत्रव्यवहार करून या दुभाजकाकडे लक्ष देण्यास सांगितले मात्र सुप्रीम कंपनी प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही असे सार्वजनिक बांधकाम विभागा कडून सांगण्यात आले. दरम्यान, दुभाजक तत्काळ हटवा किंवा येथील रस्ता रूंद करा अन्यथा वाहनचालक येथे रास्ता रोको आंदोलन छेडतील असा इशारा येथील वाहनचालकांनी दिला आहे.