अपघातवार ...राज्यात तीन अपघातांमध्ये ११ ठार
By Admin | Updated: September 8, 2015 09:29 IST2015-09-08T09:29:07+5:302015-09-08T09:29:26+5:30
मंगळवारी पहाटे राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

अपघातवार ...राज्यात तीन अपघातांमध्ये ११ ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई/औरंगाबाद, दि. ८ - मंगळवारी पहाटे राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. औरंगाबादमध्ये स्विफ्ट व टव्हेरा गाडीत झालेल्या धडकेत ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मुंबईतील माहिम परिसरातही भरधाव वेगात असलेल्या इनोव्हाने पादचा-यांना धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर लोणी कोल्हार मार्गावर टेम्पो व टव्हेरा गाडीच्या धडकेत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री उशीरा औरंगाबाद - नगर रोडवर स्विफ्ट गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने समोरुन येणा-या टव्हेरा गाडीला धडक दिली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असू मृतांमध्ये गंगापूर पोलिस ठाण्याचे अशोक थोरात, भगवान दुधे व मेहबूब सय्यद या तिघा पोलिसांचा समावेश आहे. या अपघातातील एका मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.
मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास लोणी कोल्हार रस्त्यावर टेम्पोने टव्हेरा गाडीला धडक दिल्याने तिघा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर पाच प्रवासी जखमी झाले. मुंबईतील माहिम येथेही इनोव्हा गाडीने पादचा-यांना धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.