अमरावतीच्या माहिती आयुक्तांसह कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: March 26, 2016 22:05 IST2016-03-26T21:50:13+5:302016-03-26T22:05:50+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडावर मोटार आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार, तर एक महिला जखमी झाली. हुबळी-अंकोला महामार्गावरील किरुवती

अमरावतीच्या माहिती आयुक्तांसह कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू
बेळगाव : चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडावर मोटार आदळून झालेल्या भीषण अपघातात चारजण ठार, तर एक महिला जखमी झाली. हुबळी-अंकोला महामार्गावरील किरुवती गावाजवळ शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमघ्ये अमरावतीचे माहिती आयुक्त दत्तात्रय बन्सोड (६४) , त्यांच्या पत्नी अलका तसेच पंकज बन्सोड व कारचालक राहुल बन्सोड यांचा समावेश आहे. तर, बन्सोड यांची कन्या स्नेहल या गंभीर जखमी झाल्या आहेत.
कारवार जिल्ह्यातील यल्लापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बन्सोड कुटुंबीय मोटारीने यल्लापूरकडून हुबळीकडे जाताना हा अपघात झाला. राहुल बन्सोड मोटार चालवित होता. हुबळी-अंकोला महामार्गावरील किरुवती गावाजवळ त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी वळणावरील झाडावर जाऊन आदळली आणि त्यानंतर दोनदा उलटली. त्यात राहुल हा जागीच ठार झाला. दत्तात्रय बन्सोड आणि अलका बन्सोड यांचा यल्लापूर येथील सरकारी रुग्णालयामध्ये तर, पंकज यांचा हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दत्तात्रय बन्सोड यांची कन्या स्नेहल या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)