कशेडी घाटात अपघात; दोन महिला ठार
By Admin | Updated: May 21, 2016 02:36 IST2016-05-21T02:36:33+5:302016-05-21T02:36:33+5:30
कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यात मृत्यू झाला

कशेडी घाटात अपघात; दोन महिला ठार
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चोळई गावच्या हद्दीत वळणावर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली असून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यात मृत्यू झाला, तर दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मृत महिलेचे नाव मीनल रामचंद्र जोशी (५१) असून सरस्वती गणपत जोशी या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चालक रामचंद्र शंकर जोशी व मुलगा राहुल हे जखमी झाले. हे सर्व एकाच कुटुंबातील असून नवी मुंबईतील खारघर परिसरातील रहिवासी आहेत.
देवगडकडून मुंबईकडे आपल्या गाडीने जात असताना रामचंद्र जोशी यांचा घाटातील वळणावर गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या खाली जाऊन हा अपघात घडला. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. मोकल तपास करीत आहेत. (वार्ताहर)