अपघात विमा दावे घोटाळ्याची चौकशी
By Admin | Updated: September 5, 2016 04:02 IST2016-09-05T04:02:08+5:302016-09-05T04:02:08+5:30
अपघात विमा दावे घोटाळ््यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला सादर करण्यात आला आहे.

अपघात विमा दावे घोटाळ्याची चौकशी
राजेश निस्ताने,
यवतमाळ- अपघात विमा दावे घोटाळ््यांची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला सादर करण्यात आला आहे. ‘लोकमत’मधून या घोटाळ्यांची वृत्तमालिका चालविण्यात आली होती. अपघात विमा कंपन्यांची कशी कोट्यवधी रुपयांनी फसवणूक होत आहे, याचे या वृत्तमालिकेतून पुरावेही दिले होते.
बार कौन्सिल आॅफ इंडियाने या वृत्तमालिकेची दखल घेऊन अपघात विमा दावे घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलला दिले होते. त्यानुसार निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्या खरे यांना चौकशीसाठी नियुक्त करण्यात आले.
गेले तीन महिने यवतमाळमध्ये ही चौकशी चालली. या चौकशीचा अहवाल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलकडे नुकताच सादर करण्यात आला आहे. बार कौन्सिलच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा अहवाल जसाचा तसा बार कौन्सिल आॅफ इंडियाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
>मिळाले भक्कम पुरावे ?
निवृत्त न्यायाधीशांनी केलेल्या चौकशीत नेमके काय निष्पन्न झाले आणि अहवालात काय नमूद आहे, हे स्पष्ट नसले तरी अपघात विमा दाव्यातील गैरप्रकारांचा एकूणच गोंधळ पुढे आल्याचे व त्याचे भक्कम पुरावेही मिळाल्याचे बोलले जाते. या गैरप्रकारांमध्ये पोलीस, डॉक्टर, वकील, विमा सर्वेअर, विमा अधिकारी असे सर्वच घटक कमी-अधिक प्रमाणात सहभागी असल्याची गंभीर बाब चौकशीदरम्यान पुढे आल्याची चर्चा आहे.
>लाभ मिळविण्यासाठी गैरप्रकार
अपघात विम्याचा लाभ मिळविण्यासाठी पोलिसांच्या साक्षीने राज्यात बहुतांश ठिकाणी गैरप्रकार सुरू आहेत. अज्ञात वाहन असताना सोईचे वाहन घटनास्थळावर दाखविणे, पैसे देऊन चालक उभा करणे, त्याआधारे विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईचे सुमारे एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे दाखल करणे, या कंपन्यांच्या सर्वेअर, संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज करणे आदी प्रकार सर्रास सुरू आहे. यात ‘टक्केवारी’नुसार काही वकिलांचाही सहभाग दिसून आल्याने बार कौन्सिल आॅफ इंडियाने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली.
आणखी तीन जिल्ह्यांत चौकशी
अपघात विमा दाव्यातील यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आलेला घोटाळा पाहून परभणी, हिंगोली, वाशिम या लगतच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा न्यायाधीशांमार्फत तेथील प्रकरणांची चौकशी केली जात असल्याची माहिती विधि सूत्रांनी दिली.