केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात
By Admin | Updated: July 8, 2016 19:16 IST2016-07-08T19:16:05+5:302016-07-08T19:16:05+5:30
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील शासकीय वाहनाला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. यात त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांसह वाहनचालक आणि एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहेत

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील शासकीय वाहनाला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. यात त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांसह वाहनचालक आणि एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रपूरपासून १० किलोमीटर अंतारवरील मोरवा गावाजवळ ही घटना घडली.
मंत्रीमंडळातील फेरबदलानंतर आपल्या नव्या खात्याचा पदभार घेण्यासाठी ना. अहीर चंद्रपुरातील आपल्या निवासस्थानाहून सकाळी पाऊणेसहा वाजता शासकीय वाहनाने नागपूरकडे रवाना झाले होते. सकाळपासूनच पाऊस सुरु होता. दरम्यान, मोरवानजीकच्या शनिमंदिराजवळ तञयांच्या ताफ्यातील एमएच ३४, जी ९९९९ या शासकीय वाहनाच्या चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे वाहन अनियंत्रीत होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जावून आदळले. यात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. घटना घडली तेव्हा वाहनामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक आंबुलकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पंडीत, वाहनचालक सतीश उपाध्याय आणि मंत्र्यांचे कार्यकर्ते संतोष यादव होते. या चौघांनाही पोलिसांनी तातडीने चंद्रपुरातील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले.
अपघात घडला तेव्हा मंत्र्यांचा ताफा बराच पुढे निघून गेला होता. मात्र अपघाताचे वृत्त कळताच ते माघारी आले. घटनास्थळाची पहाणी करून व त्यानंतर रूग्णालयात जावून त्यांनी सर्व जखमींची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचा नियोजित दौराही रद्द केला.
अपघाताचे वृत्त कळताच त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र अपघातग्रस्त वाहनात मंत्री नसल्याचे कळल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारपर्यंत भेटीसाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
मंत्री अपघातातून बचावले
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा ताफा घरून निघाला तेव्हा हंसराज अहीर एमएच ३४, जी ९९९९ याच वाहनात बसले होते. यापूर्वी खत रसायन मंत्री असताना ते हेच वाहन नेहमी वापरत असत. मात्र गृहराज्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी नवे शासकीय वाहन आले होते. शहराबाहेर ताफा निघाल्यावर काही वेळाने ना. अहीर त्या वाहनातून उतरून दुसऱ्या वाहनात बसले. काही अंतर पुढे गेल्यावर ही अपघाताची घटना घडली. त्या वाहनात नसल्याने ते सुदैवाने अपघातातून बचावले.