खासदाराच्या शाळेत विद्यार्थी नेणाऱ्या बोलेरोला अपघात
By Admin | Updated: July 17, 2014 01:00 IST2014-07-17T01:00:28+5:302014-07-17T01:00:28+5:30
रिसोड येथील भावना इंग्रजी पब्लिक स्कूलमध्ये मेळघाटातील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीला परतवाडा-अकोला मार्गावरील सावळी गावानजीक अपघात झाला. मंगळवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास ही घटना घडली.

खासदाराच्या शाळेत विद्यार्थी नेणाऱ्या बोलेरोला अपघात
१ गंभीर, १२ जण जखमी : परतवाड्यानजीकची घटना
नरेंद्र जावरे - अचलपूर
रिसोड येथील भावना इंग्रजी पब्लिक स्कूलमध्ये मेळघाटातील विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बोलेरो गाडीला परतवाडा-अकोला मार्गावरील सावळी गावानजीक अपघात झाला. मंगळवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास ही घटना घडली. यात नऊ विद्यार्थ्यांसह दोन पालक जखमी झाले असून एक विद्यार्थी गंभीर आहे.
चिखलदरा तालुक्यातील काजलडोह, गांगरखेडा, कन्हेरी आदी गावांतील हे विद्यार्थी आहेत. श्रावण भीमराव कवडे (१०), विष्णू भीमराव कवडे (९), आकाश भीमराव कवडे (८, रा. काजलडोह), गजानन राजेंद्र भुसूम (११), गौरव श्रीराम मावस्कर (११), सज्जूलाल साबुलाल बेठेकर (११), संकेश साहेबराव बेठेकर (१२, रा. गांगरखेडा), राजेंद्र नागा भुसूम (३६) मोतीलाल काडना धिकार (४५), कालू चन्नू मावस्कर (३०) अशी जखमींची नावे आहेत. रवी कालू मावस्कर (११, रा. कन्हेरी) हा विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याला परतवाडा येथील खासगी रुग्णालयातून अमरावतीला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील देवगाव फाटा स्थित भावना इंग्रजी पब्लिक स्कूलमध्ये हे विद्यार्थी एमएच २७ ए. आर. ६१६२ या बोलेरो गाडीने जात होते. परतवाडा-अकोला मार्गावरील सावळी गावानजीक रस्त्यावर बकरी आडवी आल्याने चालक गणेश बडले याने ब्रेक मारला. पाऊस सुरू असल्यामुळे गाडी गोलफिरुन कडूनिंबाच्या झाडावर मागच्या भागाने आदळल्याने हा अपघात झाला.
घटनेची माहिती परतवाडा वाहतूक पोलिसांना मिळताच जखमींना एका आॅटोने दोन किलोमीटर अंतरावरील परतवाडा येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. किरकोळ जखमी विद्यार्थांना उपचार करून सुटी देण्यात आली.