आबांच्या सूचनेवरूनच गृहखाते स्वीकारले--काँग्रेसचा उमेदवार असणार नाही
By Admin | Updated: March 3, 2015 00:29 IST2015-03-02T23:54:02+5:302015-03-03T00:29:22+5:30
जयंत पाटील : तुम्हाला साथ द्यायला आलोय म्हणत आबांच्या कार्यकर्त्यांना दिलाशाचा प्रयत्न

आबांच्या सूचनेवरूनच गृहखाते स्वीकारले--काँग्रेसचा उमेदवार असणार नाही
तासगाव : आर. आर. आबा राज्यस्तरीय नेते होते. त्यांच्या शब्दापलीकडे मी, आमचा पक्ष कधीच गेला नाही. त्यांच्याच सूचनेनुसार मी राज्याचे गृहमंत्रीपद स्वीकारले होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुमच्याबरोबर राहणे हे माझे कर्तव्य आहे. मी तुम्हाला साथ द्यायला आलोय, असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी आज (सोमवारी) तासगावात केले.येथील स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, मी मतदारसंघात नेता व्हायला आलेलो नाही. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला साथ द्यायला आलो आहे. आबा राज्यस्तरीय नेते होते. त्यांच्या जाण्याने तयार झालेली पोकळी न भरून येणारी आहे.
आज आपला नेता नाही, अशा कठीण प्रसंगात सर्वच कार्यकर्त्यांनी संघटितपणे एकत्र राहणे गरजेचे आहे. मतदारसंघातील तुमचे निर्णय तुम्हीच घ्यायचे आहेत, त्यामध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. आर. आर. आबा व माझ्यामध्ये नेहमी विश्वासाचे संबंध राहिले. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. सांगली जिल्ह्याच्या राजकारणाचे अनेक निर्णय एकत्रपणाने घेतले, त्यांची उंची खूप मोठी होती, काही दिवसानंतर ते समजेल. मंत्रिमंडळात आबांबरोबर एकत्र काम करतानाच्या अनेक आठवणींना जयंत पाटील यांनी यावेळी उजाळा दिला. माजी आ. विलासराव शिंदे म्हणाले की, आबांच्या जाण्याने तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान झाले. आबांच्या निधनानंतर मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी एकसंध राहणे आवश्यक आहे.यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. काका पाटील, दिलीपतात्या पाटील, अविनाशकाका पाटील, महांकाली साखर कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, माजी जि. प. सदस्य सुनील पाटील यांची भाषणे झाली. (वार्ताहर)
पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचे असणे व आबांचे नसणे...
आर. आर. आबांच्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असे. आबाही मतदारसंघात असो वा राज्यभरात कुठेही, कार्यकर्त्यांशिवाय कधीही ते दिसले नाहीत. सुमारे तीन दशके हे चित्र तासगावच्या राजकीय पटलाचे समीकरण बनले होते. आबांनी कार्यकर्त्यांना व कार्यकर्त्यांनी आबांना नेहमीच जपले. अंजनी, तासगाव, सांगली, मुंबई, गडचिरोली, राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठेही आबांभोवती नेहमी कार्यकर्त्यांची गर्दी उसळलेली असे. मात्र आर. आर. आबांच्या निधनानंतर आज पहिल्यांदाच मतदारसंघातील त्यांचे कार्यकर्ते एवढ्या संख्येने एकत्र जमले होते. सर्व प्रमुख कार्यकर्ते एकत्र येणे व त्या बैठकीत आबा नसणे, अशी गोष्ट आज पहिल्यांदाच घडली. हा प्रसंग उपस्थित सर्वांच्याच मनात काहूर उठवून गेला.
पाणीप्रश्नी सोबत
दुष्काळी भागाला फलदायी ठरणाऱ्या आरफळ, विसापूर, पुणदी, ताकारी, म्हैसाळ या पाणी योजना व त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे पाणी हे आबांनी स्वप्न पाहिले होते. येत्या आठ दिवसांत या योजना सुरू होणार आहेत. पाण्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागला तरी, मी तुमच्याबरोबर राहीन, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचा उमेदवार असणार नाही
माजी उपमुख्यमंत्री, आमदार आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाची होणारी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तसेच नेतेमंडळींचीही अपेक्षा आहे. आबांच्या पत्नी, मुलगी, अथवा बंधुंना येथून उमेदवारी मिळावी, अशीही मागणी विविध पातळीवर होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी याबाबत भाष्य करत कॉंग्रसची भूमिका स्पष्ट केली. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. आर. आर. आबांना हीच आमच्याकडून आदरांजली असेल, असेही मोहनराव कदम म्हणाले.