द्रुतगतीवरील वाहतूक विस्कळीत
By Admin | Updated: May 21, 2016 01:43 IST2016-05-21T01:43:43+5:302016-05-21T01:43:43+5:30
अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारे दोन मोठे मालवाहू ट्रक बंद पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास विस्कळीत झाली

द्रुतगतीवरील वाहतूक विस्कळीत
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ शुक्रवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारे दोन मोठे मालवाहू ट्रक बंद पडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास विस्कळीत झाली होती.
सकाळी सातच्या सुमारास हे ट्रक बंद पडले होते. साडेनऊच्या सुमारास ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आल्यानंतर दहाला द्रुतगती मार्गावर वाहतूक पूर्वपदावर आली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील दोन लेन या घटनेमुळे बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणारे दोन मालवाहू ट्रक अमृतांजन पुलाजवळील उतारावर रस्त्यामध्ये बंद पडल्याने दोन लेन बंद पडल्या होत्या. यामुळे एका लेनवर वाहतुकीचा ताण वाढून वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. साडेनऊच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने हे ट्रक बाजूला करण्यात आले. मात्र,या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास दहा वाजले होते.
द्रुतगतीवरील वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वळविल्याने लोणावळ्यातही वाहतूककोंडी झाली होती. द्रुतगतीवर वारंवार होणारे अपघात व वाहतूककोंडी यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक व प्रवासी हैराण झाले असून, शासनाने यावर काही तरी तोडगा काढावा, अशी मागणी करीत आहेत. (वार्ताहर)
>