एसीबीने ओलांडली शंभरी
By Admin | Updated: September 11, 2014 01:11 IST2014-09-11T01:11:32+5:302014-09-11T01:11:32+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबीने) नागपूरने आज लाचखोरांविरुद्ध चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन सापळे यशस्वी केले. आजच्या कारवाईसोबतच एसीबीने कारवाईची शंभरी ओलांडली.

एसीबीने ओलांडली शंभरी
आतापर्यंत १०२ कारवाया : १३१ लाचखोर अडकले
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबीने) नागपूरने आज लाचखोरांविरुद्ध चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एका पाठोपाठ दोन सापळे यशस्वी केले. आजच्या कारवाईसोबतच एसीबीने कारवाईची शंभरी ओलांडली. तसेच जानेवारी ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत एसीबीने १३१ लाचखोर जेरबंद केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाचखोरांविरुद्धच्या कारवाईचा हा आकडा दुप्पट आहे.
एसीबीचा नागपूर विभाग यावर्षी लाचखोरांविरुद्ध कमालीचा आक्रमक झाला आहे. भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालण्यासाठी एसीबीचे स्थानिक अधिकारी कमालीचे सक्रिय झाले आहेत. १ जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत नागपूर एसीबीने एकूण १०० लाचेचे सापळे यशस्वी केले. आज दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विश्वास सलामे यांना १५ हजारांची लाच घेताना तर, सायंकाळी गडचिरोली येथील एसटीचे विभाग नियंत्रक विनोद चौरे यांना पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याबरोबरच एसीबीच्या यावर्षीच्या कारवाईचा आकडा १०२ वर पोहोचला. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ५१ कारवाया करण्यात आल्या होत्या. लाचखोरांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तक्रारदारांनी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा आणि लाचखोरांची माहिती द्यावी, असे आवाहन एसीबीचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
भ्रष्टाचारात महसूल विभाग अव्वल
लाचखोरीत महसूल विभाग अव्वलस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसीबीने या विभागातील १९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडले. दुसऱ्या स्थानावर पोलीस आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती आहे. कारण पोलीस विभागातील १५ अधिकारी, कर्मचारी आणि तेवढेच अधिकारी, कर्मचारी जिल्हा परिषद-पंचायत समितीचे लाच घेताना सापडले. वीज मंडळ तिसऱ्या स्थानावर (१० लाचखोर) तर शिक्षण विभाग लाचखोरीत चौथ्या स्थानावर (८ लाचखोर) आहे. आरोग्य विभागाचे चार, महापालिका तीन, आरटीओ दोन आणि अन्य काही विभागाचेही दोन, एक असे अधिकारी, कर्मचारी कारवायात अडकले.