संसदेतल्या उपाहारगृहापेक्षाही अकोल्यात मिळते स्वस्त जेवण !
By Admin | Updated: July 29, 2016 19:39 IST2016-07-29T19:28:40+5:302016-07-29T19:39:56+5:30
अत्यंत कमी किमतीत जेवन करायचे असेल, तर तुम्हाला राजधानी दिल्ली येथील संसद भवनच्या कँटीनमध्ये जावे लागेल.

संसदेतल्या उपाहारगृहापेक्षाही अकोल्यात मिळते स्वस्त जेवण !
अतुल जयस्वाल/ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 29 - अत्यंत कमी किमतीत जेवण करायचे असेल, तर तुम्हाला राजधानी दिल्ली येथील संसद भवनच्या कँटीनमध्ये जावे लागेल. ते शक्य नसल्यास अकोल्यात या, येथे तुम्हाला दहा रुपयांत जेवण मिळू शकते. केवळ पैसे नाहीत म्हणून कोणी उपाशी राहू नये, या उद्देशाने येथील अशोक बनकर ध्येयवेड्या तरुणाने गत २५ वर्षांपूर्वी सुरु केलेला दहा रुपयांत दहा पुऱ्या व एक प्लेट सोयाबीनची रस्सेदार भाजी देण्याचा हा व्यवसाय आजतागायत सुरु आहे. श्रमीकांपासून बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत येथे येऊन आपली क्षुधा भागवताना दिसतात.
अशोक बनकर यांचे वडील रामभाऊ बनकर यांचे जनता बाजारात २८ वर्षांपूर्वी एक छोटेसे हॉटेल होते. त्यामुळे या व्यवसायाची त्यांना पार्श्वभूमी होतीच. या व्यवसायाला आणखी वाढविण्याच्या दृष्टीने अशोक यांनी त्यांच्या भावासोबत नेहरु पार्क चौकात नाश्ताची गाडी सुरु केली. यावेळी त्यांच्या मनात लोकांना कमी पैशात जेवन देण्याचे विचार घोळू लागले. हा विचार प्रत्यक्षात आणत त्यांनी २५ वर्षांपूर्वी दुसरी गाडी सुरु करून एका रुपयात पुरी भाजी देणे सुरु केले. सुरवातीला एक किलो कणिकच्या पुऱ्या व दोन किलो बटाटा-वांग्याची भाजी असा सुरु झालेला हा प्रवास आता ५० किलो कणकेच्या पुऱ्या आणि मोठा गंज भरून सोयाबीनची भाजीपर्यंत आला आहे.
नेहरु पार्क जवळच्या पाण्याच्या टाकीजवळ अशोक यांची गाडी असून सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत येथे दहा रुपयांत जेवन मिळते. २५ वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. येथे दररोज साधारणत: ५०० ते ६०० जण जेवतात. या कामात मदत करण्यासाठी त्यांनी मदतनिस ठेवले आहेत. त्यांच्या या व्यवसायामुळे १२ ते १५ लोकांना रोजगारही प्राप्त झाला आहे. चव आणि दर्जा याबाबत कोणतीही तडजोड न करणाऱ्या अशोक यांच्या गाडीवरचे जेवण करण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत असते.
उर्जेसाठी सोयाबीनची भाजी
अशोक यांच्या गाडीवर येणारे लोक मुख्यत्वे श्रमीकवर्गातील आहेत. दिवसभर काम करताना त्यांना जेवनातून उर्जा मिळावी, या हेतूने प्रथिनांनी समृद्ध असलेल्या सोयाबीनच्या वड्यांची भाजी या ठिकाणी मिळते. दहा पुऱ्या व भाजीमधून मिळणारी उर्जा दिवसभर पुरते, असे येथे जेवण करणारे सांगतात.