मुंबईत धावत्या रिक्षात महिलेसोबत गैरवर्तन
By Admin | Updated: July 13, 2017 05:51 IST2017-07-13T05:51:48+5:302017-07-13T05:51:48+5:30
रिक्षात तरुणीच्या विनयभंगाचे प्रकरण ताजे असतानाच गोराईमध्ये रिक्षाचालकाडून नोकरदार महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली

मुंबईत धावत्या रिक्षात महिलेसोबत गैरवर्तन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ठाण्यात धावत्या रिक्षात तरुणीच्या विनयभंगाचे प्रकरण ताजे असतानाच गोराईमध्ये रिक्षाचालकाडून नोकरदार महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. गोराई पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.
गोराई परिसरात ३७ वर्षीय तक्रारदार महिला कुटुंबीयांसह राहते. त्या एका नामांकित कंपनीत नोकरी करतात. शनिवारी कामावरून निघाल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोराई मनोरी रोड येथून गोराई गावासाठी रिक्षा पकडली. रिक्षा निर्जन स्थळी पोहोचताच चालकाने सुरुवातीला अश्लील शेरेबाजी सुरू केली. त्यांनी त्याला दम दिला. तरीही त्यांच्याकडे पाहून तो अश्लील चाळे करतच होता. महिलेने रिक्षा थांबविण्याची विनवणी केली. तेव्हा त्याने आणखी वेगाने रिक्षा चालवण्यात सुरुवात केली. १५ मिनिटांनंतर त्याने रिक्षा थांबवली. तेव्हा तक्रारदार महिला रिक्षातून खाली उतरली व तिने घर गाठत कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला.
>जूनमध्ये ठाण्यात घटना
७ जून २०१७ रोजी ठाण्यातील एका २३ वर्षीय तरुणीवर कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता.