अबू सालेमला जन्मठेप
By Admin | Updated: February 26, 2015 06:03 IST2015-02-26T06:03:39+5:302015-02-26T06:03:39+5:30
दहा दशकापूर्वी गँगस्टर अबू सालेमला पोर्तुगालकडून ताब्यात घेतल्यानंतर आज तब्बल १५ वर्षांनी विशेष टाडा न्यायालयाने त्याला बहुचर्चित प्रदीप जैन खून

अबू सालेमला जन्मठेप
मुंबई : दहा दशकापूर्वी गँगस्टर अबू सालेमला पोर्तुगालकडून ताब्यात घेतल्यानंतर आज तब्बल १५ वर्षांनी विशेष टाडा न्यायालयाने त्याला बहुचर्चित प्रदीप जैन खून खटल्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही जन्मठेप म्हणजे आजन्म कारावास आहे. मात्र पोर्तुगाल करारानुसार सालेमला फाशी किंवा आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावता येत नसल्याने सरकारकडून ही जन्मठेप २५ वर्षांपर्यंत करण्यात येईल.
जैन यांचा खून १९९५ मध्ये झाला होता. त्यामुळे या घटनेच्या तब्बल वीस वर्षांनी हा निकाल आला आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर सालेमला शिक्षा झाल्याने तपास अधिकारी व विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सालेम विरोधात १९९३ चा बॉम्बस्फोट खटला देखील सुरू आहे. जैन हत्याकांडाचा खटला चालवणारे विशेष टाडा न्यायाधीश जी. ए. सानप यांच्यासमोरच ९३ च्या बॉम्बब्लास्ट खटल्याची सुनावणी सुरू आहे. जैन हत्याकांडाचा निकाल जाहीर केल्यानंतर न्यायालयाने ९३ च्या खटल्यातील विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांना बोलावून घेतले. या खटल्याची सुनावणीचे वेळापत्रक उद्या, गुरुवारी तयार करणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
जैन हत्याकांड प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने सालेमसह आरोपी मेहंदी हसनलाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी विरेंद्रकुमार यांची हत्येच्या आरोपातून सुटका केली आहे. (प्रतिनिधी)