फरार आरोपीला अखेर अटक
By Admin | Updated: June 27, 2016 05:03 IST2016-06-27T05:03:43+5:302016-06-27T05:03:43+5:30
सुनील गवळी उर्फ कोडी याला अखेर तीन महिन्यांनी अटक करण्यात वर्तकनगर पोलिसांना यश आले आहे.

फरार आरोपीला अखेर अटक
ठाणे : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी तसेच घराचे बांधकाम केले म्हणून १० हजारांची खंडणी उकळण्याकरिता संजय यादव (३०) याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या सुनील गवळी उर्फ कोडी याला अखेर तीन महिन्यांनी अटक करण्यात वर्तकनगर पोलिसांना यश आले आहे. हल्ल्यासाठी त्याने वापरलेला लोखंडी खलबत्ता पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दीड महिन्यापूर्वी अन्य एक आरोपी राजकुमार दुबे याला सांताक्रुझमधून अटक केली होती.
या प्रकरणातील सुनील तिवारी उर्फ नाटा, राकेश उर्फ कल्लू तिवारी हे त्यांचे उर्वरित साथीदार अद्यापही पोलिसांना हुलकावण्या देत आहेत. गवळी आणि राजकुमार दुबेसह पाच जणांच्या टोळीने संजयवर १० मार्च रोजी लोकमान्यनगर भागात खुनी हल्ला केला. एका भांडणात ४ मार्च रोजी संजयने मध्यस्थी केली होती. त्याच्याकडे घराच्या बांधकामावरूनही पैशांची मागणी करण्यात आली. यातूनच उद्भवलेल्या वादातून हा हल्ला झाला. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हाणामारी, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून वर्तकनगर पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. सहायक पोलीस निरीक्षक एस.एल. गायकवाड, हवालदार माणिक आहेर, भूषण गावडे, सुनील निकम, तात्या बल्लाळ, गोरक्षनाथ दराडे, भागवत दहिफळे आणि हेमंत पगारे आदींच्या पथकाने गवळीला येऊरच्या जंगलातून २० जून रोजी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, त्याची रवानगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात केली आहे. (प्रतिनिधी)