अबब! १४ हजार पदांसाठी सुमारे ५ लाख अर्ज
By Admin | Updated: February 14, 2017 04:13 IST2017-02-14T04:13:09+5:302017-02-14T04:13:09+5:30
बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन प्रत्येक सरकारकडून दिले जात असतानाच, तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही.

अबब! १४ हजार पदांसाठी सुमारे ५ लाख अर्ज
मुंबई : बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन प्रत्येक सरकारकडून दिले जात असतानाच, तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाते. याचे उदाहरण म्हणजे, एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेला मिळालेला प्रतिसाद. एसटी महामंडळाकडून चालक तथा वाहक, लिपिक-टंकलेखक, सहायक व पर्यवेक्षक दर्जाच्या एकूण १४,२४७ रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अर्ज मागवले. एसटीच्या या भरती प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ४ लाख ९७ हजार ७५३ अर्ज प्राप्त झाले. यात लिपिक-टंकलेखकच्या २ हजार ५४८ पदांसाठी पावणे दोन लाख अर्ज आले आहेत. एसटीच्या आगरक्षक या एका पदासाठी ३ हजार ९७३ अर्ज मिळाले असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने, सध्याच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडतो. हे लक्षात घेता, एसटी महामंडळाने १४ हजार २४७ रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या वेबसाइटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारी २0१७ पासून उपलब्ध करण्यात आली. ही मुदत ११ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. अखेर एसटी महामंडळाला ४ लाख ९७ हजार ६९५ इतके अर्ज प्राप्त झाले. यात चालक तथा वाहक पदासाठीही ६८ हजार ८३५ अर्ज आले आहेत. चालक तथा वाहकांच्या एकूण ७ हजार ९२३ रिक्त जागा आहेत. त्यामुळे या पदालाही चांगला प्रतिसाद मिळाला. सहायकच्या (मेकॅनिक) ३ हजार २९३ रिक्त जागांसाठी ८३ हजार ४९८, तर भांडार पर्यवेक्षकच्या दोन पदांसाठी ६ हजार ५२२ अर्ज आल्याचे सांगण्यात आले.