अबब! ६ महिन्यांत १६९ लाच प्रकरणे
By Admin | Updated: November 18, 2014 00:56 IST2014-11-18T00:56:20+5:302014-11-18T00:56:20+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालय गेल्या ६ महिन्यांपासून अधिक ‘अॅक्टीव्ह’ झाले असून कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. १ एप्रिलपासून ते १५ आॅक्टोबरपर्यंत एकूण १६९ लाच

अबब! ६ महिन्यांत १६९ लाच प्रकरणे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ‘अॅक्टिव्ह’
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालय गेल्या ६ महिन्यांपासून अधिक ‘अॅक्टीव्ह’ झाले असून कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. १ एप्रिलपासून ते १५ आॅक्टोबरपर्यंत एकूण १६९ लाच प्रकरणे नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. आकडेवारीकडे लक्ष टाकले असता मागील वर्षीच्या तुलनेत या साडेसहा महिन्यातच दुपटीहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. महसूल व पोलीस खात्याचे अधिकारी सर्वात जास्त प्रमाणात या सापळ्यात अडकले आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या वर्षभरातील लाच प्रकरणांसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे विचारणा केली होती. यातून मिळालेल्या आकडेवारीनुसार भ्रष्टाचाराची वाढती प्रकरणे, लाच मागण्याचे वाढते प्रमाण यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढला आहे. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्याचे प्रमाण गेल्या ६ महिन्यात वाढले आहे. गेल्या ६ महिन्यांत १६९ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. यात ५ लाख पेक्षा अधिक लाच रक्कम स्वीकारलेले १ प्रकरण असून उर्वरित १६८ प्रकरणांमध्ये ५ लाखांहून कमी लाच स्वीकारण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित एका प्रकरणात ५ लाखांची रोख रक्कम व ८ लाखांचा धनादेश अशी एकूण १३ लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. १५ आॅक्टोबरपर्यंत ४९२ लाच प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याची माहितीदेखील देण्यात आली. (प्रतिनिधी)
लाच प्रकरणांत दुपटीहून अधिक वाढ
१ जानेवारी २०१४ ते १५ आॅक्टोबर २०१४ या कालावधीत ११९ सापळे रचण्यात आले व यात १५६ सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या वर्षभरात ६५ यशस्वी सापळे रचण्यात आले होते व ७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवघ्या साडेदहा महिन्यांतच लाचखोरीची दुपटीहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
महसूल विभागावर करडी नजर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त सापळ््यांत महसूल विभागाचे कर्मचारी अडकले आहेत. महसूल विभागात २१ सापळे रचण्यात आले व यात वर्ग-१ च्या २ अधिकाऱ्यांसह एकूण २३ जण अडकले. विभागाची पोलीस खात्यावरदेखील नजर असून १७ सापळ््यांत पोलीस विभागाशी संबंधित २१ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.