पीएमपीबद्दल महापालिका उदासिन
By Admin | Updated: June 4, 2014 22:35 IST2014-06-04T21:02:59+5:302014-06-04T22:35:43+5:30
डिझेल दरवाढ आणि वाढती देणी यांमुळे गाळात चाललेल्या पीएमपीला बाहेर काढण्याऐवजीपालनकर्ते असलेल्या दोन्ही महापालिकांनी पाठ फिरविली आहे.

पीएमपीबद्दल महापालिका उदासिन
थकीत रक्कम देईनात : कामगारांच्या पगारावर गदा येण्याची शक्यता
पुणे : डिझेल दरवाढ आणि वाढती देणी यांमुळे गाळात चाललेल्या पीएमपीला बाहेर काढण्याऐवजीपालनकर्ते असलेल्या दोन्ही महापालिकांनी पाठ फिरविली आहे. मे २०१४ चे कर्मचा-यांचे पगार करण्याकरीता प्रशासनाकडे पुरेसे पैसे नाहीत. परंतु तरीही दोन्ही महापालिकांनी या परिस्थितीकडे डोळेझाक केली असून पालिकांनी पीएमपीला द्यावयाची सुमारे २०० कोटी रुपयांची रक्कम अद्याप दिलेली नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्त पीएमपीच्या संचालक मंडळावर आहेत. तरीही पीएमपीला महापालिकेकडून येणारी थकबाकी मिळू शकत नाही, हे दुर्देव आहे. पीएमपीची तूट महापालिकांनी भरुन काढावी, असे आदेश शासनातर्फे १८ फेब्रुवारी रोजी काढण्यात आले. परंतु अजूनही पीएमपीमध्ये हिशेबाचे ऑडिट करण्याकरीता अधिकारी पाठविण्यात आलेले नाहीत. यावरुनच सार्वजनिक वाहतुकीबद्दल महापालिका उदासिन असल्याचे दिसून येते.
पीएमपीतील लेखनिक वर्गाचे १ तारखेला होणारे पगार झाले नसल्याने बुधवारी कामगारांनी अध्यक्ष आर.एन.जोशी यांची भेट घेतली. आर्थिक परिस्थिती नसल्याने पगार झाले नसल्याचे कारण प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पालिकांकडून मिळणारी थकबाकी टप्याटप्याने मिळाल्यास हा तिढा सोडविणे शक्य होणार आहे. पीएमपीला डिझेल, सीएनजी आणि ठेकेदारांना सुमारे ४० कोटी रुपये द्यायचे आहेत. परंतु निधीअभावी आता बस रस्त्यावर उतरविण्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालिकांकडून पीएमपीला येणी (कोटी रुपयांमध्ये)
पुणे पिंपरी-चिंचवड
संचलनातील तूट७२४६
पासची रक्कम ६२३८
मागील थकबाकी०३--
चौकट : महिन्याला द्यावा लागणारा पगार
१ तारीख४ कोटी
५ तारीख६ कोटी
१० तारीख१४ कोटी
पेन्शन१ कोटी
प्रवाशांची गैरसोय नको म्हणून पगार थांबले
सार्वजनिक वाहतूक म्हणून एकमेव पीएमपीचे साधन पुण्यामध्ये आहे. त्यामुळे सुमारे १० लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. पीएमपीला डिझेल, सीएनजी आणि ठेकेदारांची देणी यांमुळे मागील पाच महिन्यांपासून तारेवरची कसरत करावी लागत आहे. जून महिन्यात काही रक्कम देणे आवश्यक असल्याने लेखनिक पदावरील कर्मचा-यांचे पगार करण्यास उशीर झाला. परंतु वाहक, चालक आणि वर्कशॉपमधील कर्मचा-यांचे पगार वेळेवर होतील, असे पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरा शिंदेकर यांनी सांगितले.
'दोन्ही पालिकांकडून पीएमपीला येणी आहेत. त्याबद्दल आयुक्तांची भेट घेतली असून २ दिवसांत तोडगा निघेल.'
-प्रशांत जगताप
संचालक, पीएमपी