जैतापूरबाबत उद्या मुंबईत चर्चासत्र
By Admin | Updated: June 3, 2015 23:40 IST2015-06-03T22:28:19+5:302015-06-03T23:40:09+5:30
अमजद बोरकर : देशातील नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

जैतापूरबाबत उद्या मुंबईत चर्चासत्र
राजापूर : देशातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प जैतापुरात माथी मारण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प चांगला असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात तो प्रकल्प सर्वांसाठी घातक आहे. त्यातील भयानकता केवढी आहे, याचा पर्दाफाश करण्यासाठी शुक्रवार, ५ जूनला मुंबईत खास चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये नामवंत शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मच्छिमार नेते अमजद बोरकर यांनी दिली.सुमारे १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प जैतापुरात मार्गी लागत आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. त्या प्रकल्पातून होणाऱ्या रेडीएशनमुळे मानवी जीवनासह वनस्पती, बागायती, भातशेती व मच्छिमारीवर कमालीचा परिणाम होणार आहे. परिणामी कोकण भूमीच नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.या प्रकल्पातील शीतलीकरणासाठी प्रतिदिन ५ हजार २०० कोटी लीटर समुद्राचे पाणी वापरले जाणार आहे. त्यानंतर ५ ते ७ डिग्री सेंटीग्रेडचे तप्त पाणी पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार असल्याने समुद्रातील पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. त्यामुळे मच्छी उत्पादन नष्ट होऊन समस्त मच्छिमार देशोधडीला लागणार असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे चतुर्वेदी समितीच्या अहवालानुसार संपूर्ण जांभ्या दगडाचा सडा तोडून बेसॉल्ट रॉकच्या पातळीपर्यंत येण्यासाठी समुद्राच्या पातळीपर्यंत खाली जावे लागणार असल्याने त्सुनामीचादेखील धोका संभवतो. असे विविध धोके समोर दिसत असताना आमचे सरकार मात्र हा प्रकल्प सुरक्षित असल्याचा आव आणत असल्याचा आरोप बोरकर यांनी केला.
शासनाचे शास्त्रज्ञसुद्धा त्याचीच री ओढण्यात गुंतले असून, देशपातळीवरील हा प्रकल्प घातकच असल्याचे सांगताना यापूर्वी अनेक शास्त्रज्ञांनी जैतापूर परिसराला भेट देताना याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता. पण शासन मात्र त्यांचे ऐकायला तयार नाही. त्या पार्श्वभूमीवर भारतीय पर्यावरण चळवळ या संस्थेचे अॅड. शिरीष राऊत यांनी पुढाकार घेतला असून, शुक्रवारी, ५ जूनला सायंकाळी ६ वाजता दादरच्या धुरु हॉल सभागृहात जैतापूर प्रकल्पावर चर्चासत्र व मार्गदर्शनाचा कार्यक़्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला डॉ. सुरेंद्र गाडेकर, डॉ. शशी मेनन, डॉ. व्ही. मुगा झेंथी, शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)