सुमारे ८५ हजार विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगणार
By Admin | Updated: September 8, 2014 03:11 IST2014-09-08T03:11:53+5:302014-09-08T03:11:53+5:30
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या आयटीआय प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे

सुमारे ८५ हजार विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगणार
मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या आयटीआय प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. सहाव्या गुणवत्ता यादीनंतर ७२ हजार ३५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी संचालनालयाने दोन अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी सुमारे ८५ हजार विद्यार्थ्यांचे आयटीआयचे शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगणार आहे.
राज्यातील ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९८ हजार १८५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी संचालनालयाने आॅनलाइन अर्ज मागविले आहेत. प्रवेशाच्या सहा गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या आहेत. या याद्यांमध्ये प्रवेश मिळालेल्या सुमारे ७२ हजार ३५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आयटीआय प्रवेशासाठी १ लाख ८१ हजार ८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु सहाव्या आणि अखेरच्या गुणवत्ता यादीत ७२ हजार ३५१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यानंतर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी सातवी आणि आठवी फेरी राबविण्याचा निर्णय संचालनालयाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी विकल्प अर्ज सादर केले असून, सातवी गुणवत्ता यादी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
या यादीनंतर आठवी गुणवत्ता यादी ११ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)