सामाजिक दायित्व निधीत परिवर्तनाची क्षमता

By Admin | Updated: March 2, 2017 02:37 IST2017-03-02T02:37:33+5:302017-03-02T02:37:33+5:30

निधीतून अनेक लोकोपयोगी कामे हाती घेता येतात, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

The ability to convert social liabilities fund | सामाजिक दायित्व निधीत परिवर्तनाची क्षमता

सामाजिक दायित्व निधीत परिवर्तनाची क्षमता


मुंबई : सामाजिक दायित्व निधी अर्थात सीएसआर फंडात समाज बदलण्याची क्षमता असून, या निधीतून अनेक लोकोपयोगी कामे हाती घेता येतात, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
विवेकानंद इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज् अ‍ॅण्ड रिसर्च संस्थेच्या वतीने ‘सामाजिक उद्योजकता आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास विवेकानंद एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष महेश तेजवाणी, सचिव दिनेश टहलीयानी, कोषाध्यक्ष अमर असराणी, ट्रस्टी दादी वासवाणी, बलदेव बुलाणी, वरिष्ठ चार्टर्ड अकाउंटंट शैलेश हरिभक्त यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवीन कंपनी कायद्यानुसार मोठ्या कंपन्यांनी आणि उद्योजकांनी त्यांना झालेल्या लाभातून २ टक्के निधी सामाजिक दायित्वापोटी खर्च करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात सीएसआर निधीतून अनेक क्षेत्रांत अनेक प्रकारची कामे केली जात असली तरी या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आवश्यक आहे, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, भौतिक साधनं अशा विविध क्षेत्रांत या निधीच्या माध्यमातून बदल करता येऊ शकतो का? याचा क्षेत्रनिहाय अभ्यास करणे गरजेचे आहे. हा निधी योग्य कारणासाठी योग्य पद्धतीने उपयोगात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
सर्वसामान्य माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा असल्याचा संदेश स्वामी विवेकानंदांनी आपल्या कार्यातून दिला, त्यांच्या जीवनमूल्यांवर विवेकानंद इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडिज्चे काम सुरू असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, सेल्फीच्या युगात माणूस स्वकेंद्रित होत चालला आहे, त्यांच्यातील समाज तसेच देशहिताची भावना अधिक प्रबळ करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या समाजाप्रती काही दायित्व आहे हे सांगणारे आहेत. शैक्षणिक संस्थांमधून दिले जाणारे सामाजिक दायित्वाचे धडे हे अतिशय मोलाचे असून समाज, स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती यांच्यामधील दरी सांधणारे आहेत, या क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवा पिढीला सज्ज करणारे आहेत. भविष्यात भारताच्या विकासात मोलाचा वाटा असणाऱ्या सामाजिक उद्योजकतेविषयी आणि दायित्वाविषयी जागरूकता निर्माण करणारे आहेत, असेही मुनगंटीवार या वेळी म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The ability to convert social liabilities fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.