अभिषेक कुलकर्णी विजेता

By Admin | Updated: September 5, 2016 03:54 IST2016-09-05T03:54:11+5:302016-09-05T03:54:11+5:30

खेळ उंचावताना अभिषेक कुलकर्णीने अरिजीत बोसचा २-१ असा पाडाव करून दुसऱ्या महाराष्ट्र वरिष्ठ राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकावले

Abhishek Kulkarni winner | अभिषेक कुलकर्णी विजेता

अभिषेक कुलकर्णी विजेता


मुंबई : तीन गेमपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना अभिषेक कुलकर्णीने अरिजीत बोसचा २-१ असा पाडाव करून दुसऱ्या महाराष्ट्र वरिष्ठ राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद पटकावले. त्याच वेळी महिला गटात दुसऱ्या मानांकित नेहा पंडितने श्रुती मुंदडाचा २-० असा धुव्वा उडवत बाजी मारली.
गोरेगाव स्पोटर््स क्लबमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या पुरुष एकेरी अंतिम फेरीत अरिजीतने आक्रमक सुरुवात करताना पहिला गेम २१-१७ असा जिंकला. या वेळी अरिजीतचा धडाका पाहून तोच जिंकणार
अशी चित्रे होती. मात्र, अभिषेकने दुसऱ्या गेममध्ये तुफान खेळ
करून अरिजीतला कोणतीही
संधी न देता सामना बरोबरीत आणला.
निर्णायक तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी पुन्हा एकदा तोडीस तोड खेळ केला. मात्र, अभिषेकने नेटजवळ नियंत्रित खेळ करताना अरिजीतला चुका करण्यास भाग पाडले आणि या गेममध्ये बाजी मारून १७-२१, २१-९, २१-१७ अशा गुणांनी विजेतेपदावर नाव कोरले.
महिला गटात दुसऱ्या मानांकित नेहा पंडितने अपेक्षित विजय मिळवताना आक्रमक खेळ करून श्रुती मुंदडाचा सहज पराभव केला. श्रुतीने एक वेळ नेहाला कडवी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहाच्या वेगवान खेळापुढे तीचा निभाव लागला नाही. नेहाने चपळ खेळ करताना, नेटजवळून नियंत्रित खेळ करत २१-१७, २१-१५ अशी बाजी मारत जेतेपद उंचावले.
दुसरीकडे पुरुष दुहेरी गटात अभिज्ञ सावंत-प्रसाद शेट्टी जोडीने धक्कादायक विजयाची नोंद करताना संभाव्य विजेत्या अव्वल मानांकित इशान नक्वी-वरुण खानवलकर जोडीचा २१-११, २१-८ असा पराभव केला. (क्रीडा प्रतिनिधी)
>अन्य अंतिम निकाल :
मिश्र दुहेरी : वरुण खानवलकर - श्रृती मुंदडा वि.वि. सत्यजीत जगधआणे - रिया अरोलकर २१-१२, २१-१२.
महिला दुहेरी : मानसी गाडगीळ - मृण्मयी साओजी वि.वि. भगिरर्थी शर्मा बांदे - इशानी सावंत २१-१०, २१-१४.

Web Title: Abhishek Kulkarni winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.