अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पाळला काळा दिवस
By Admin | Updated: July 12, 2016 20:29 IST2016-07-12T20:29:34+5:302016-07-12T20:29:34+5:30
गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १०जुलै हा अखिल भारतीय मागणी दिवस म्हणून पाळत आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पाळला काळा दिवस
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - गेल्या २५ वर्षांपासून देशातील अंगणवाडी सेविका १०जुलै हा अखिल भारतीय मागणी दिवस म्हणून पाळत आहेत. मात्र यावर्षी केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निधीमध्ये केलेल्या कपातीमुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मुंबई जिल्हा समितीने मंगळवारी आझाद मैदानात काळा दिवस पाळला. शिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आझाद मैदानात निदर्शने केली.
सीटू आणि अखिल भारतीय अंगणवाडी सेविका, मदतनीस फेडरेशनच्या आरमायटी इराणी यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या देश पातळीवरील मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दर तीन वर्षांनी केंद्र शासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करते. मात्र २०१४ सालापासून शासनाने अपेक्षित मानधनवाढ केलेली नाही. याउलट, केंद्र आणि राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयसीडीएसवरील बजेटमध्ये कपात केली
आहे.
सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. शिवाय दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यास आणखी दिरंगाई केल्यास लवकरच आंदोलनाचे
हत्यार उपसण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही संघटनेने सांगितले.
..................
मानधन वाढ कधी करणार
अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना केरळमध्ये अनुक्रमे १० हजार व ७ हजार, हरियाणात ७ हजार ५०० व ३ हजार ७०० आणि इतर राज्यांत अनक्रमे ७ हजार व ३ हजार ५००हून अधिक मानधन मिळत आहे. मात्र, येथील राज्य शासनाने आत्तापर्यंत कर्मचाऱ्यांची आश्वासनावरच बोळवण केली आहे. प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांचे ४ ते ६ महिन्यांचे मानधन थकत आहे.
...................
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
केंद्र शासनाने आयसीडीएस केवळ तात्पुरती योजना म्हणून न राबवता, त्याचे नियमितीकरण करावे व त्याला महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत उपखात्याचा दर्जा देऊन शासनाचा कायमचा उपक्रम म्हणून राबवावा. सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. सेविकांना १० हजार व मदतनिसांना ७ हजार ५०० मानधन लागू करा.
सेविका, मदतनिसांना भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन, आरोग्यविमा, घरकुलासाठी अनुदान इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करा.
सेविका, मदतनिसांना वर्षातून १५ दिवसांची पगारी वैद्यकीय रजा व उन्हाळ्याची १ महिन्याची सुट्टी मंजूर करावी. दिवाळीला सेविका, मदतनिसांना सेविकांच्या एका मानधनाइतका समान बोनस देण्यात यावा. मानधन दर महिन्याच्या १० तारखेच्या आत नियमितपणे अदा करण्यात यावे.