Aaditya Thackeray News: शिंदेसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. या नेत्यांनी एकत्र स्नेहभोजन केले. यानिमित्ताने शिंदे यांनी डिनर डिप्लोमसी करीत युतीबाबत एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या वापराचा आग्रह धरीत राज्यातील सर्व बँकांमध्ये आंदोलन करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन केले. याच दरम्यान मंत्री सामंत यांनी राज यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज यांनी मनसैनिकांना आंदोलन थांबविण्यास सांगितले होते. या घडामोडीनंतर मंगळवारी अचानक उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राज यांची भेट घेतली आणि एकत्र स्नेहभोजन केले. शिंदेंच्या या डिनर डिप्लोमसीमागे आगामी पालिका निवडणुकीचे समीकरण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यावरून आता आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना टीकास्त्र सोडले आहे.
मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही
मी त्या भेटीवर जास्त बोलणार नाही, कारण मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही. ते एसंशी गटाचे गँगचे लीडर आहेत, आज गावी जाणार आहेत. चंद्र आज कुठल्या दिशेत आहे माहिती नाही पण त्यांचे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. नाराजी नाट्य सुरू झाले की मग गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात, या शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यासमेवत आमची कुठलीही राजकीय चर्चा झाली नसून केवळ सदिच्छा भेट होती. आजच्या भेटीत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला, अनेक जुने किस्से ऐकायला मिळाले, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली तर कळेल, असे उदय सामंत म्हणाले.