Aaditya Thackeray News: दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रात १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचे ६१ सामंजस्य करार झाले. यातून १६ लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात झालेली ही विक्रमी गुंतवणूक म्हणजे भारत आणि महाराष्ट्राची ताकद वाढत असल्याचे द्योतक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योग मंत्री पोहोचायला हव होते. पण ते मुख्यमंत्र्यांच्या नंतर गेले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होते म्हणून उशीरा गेले का? उद्योग मंत्री यांचा असा काय कार्यक्रम होता जे तिथे थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली. दावोसमध्ये अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम चुकीचा लावला आहे, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.
दोन वर्षांपासून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही
मागील दोन वर्षांपासून मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झालेला नाही. मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. बर्फाचे कपडे घालून फोटो काढण्यापेक्षा सह्याद्री किंवा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन पैसा कमी खर्च झाला असता. ऐतिहासिक गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये होईल असे म्हणत आहेत. त्यांनी ५४ MOU केले आहेत. यातील ११ विदेशी कंपन्या आहेत तर ४३ कंपन्या भारतातील आहेत. यामधील ३३ कंपन्या या महाराष्ट्रातील आहेत. एवढ्या कंपन्या भारतातील आहेत, तर मग मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम का नाही घेतला? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
दरम्यान, दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचे केंद्र आहे. जगभरातील कंपन्यांचे सीईओ जागतिक आर्थिक परिषदेसाठी येथे येतात. भारतीय कंपन्यांसोबतचे भागीदार हे परदेशातील आहेत. त्यामुळे परदेशातील भागीदारांबरोबर दावोसमध्ये करार व्हावेत, अशी या कंपन्यांची इच्छा असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.