आबलोलीत बारशीला तरूण बनतात वाघ अन...

By Admin | Updated: November 5, 2014 00:03 IST2014-11-04T21:52:16+5:302014-11-05T00:03:09+5:30

परंपरेला श्रध्देची जोड : तरूणांवर होतो शेण अन् मातीच्या गोळ्यांचा मारा...

Aabolitish Barashila becomes a young man with tiger ... | आबलोलीत बारशीला तरूण बनतात वाघ अन...

आबलोलीत बारशीला तरूण बनतात वाघ अन...

अमोल पवार - आबलोली -जग चंद्रावर, मंगळावर पोहोचत असले तरी आधुनिक युगातही ग्रामीण भागात आपल्या परंपरांचे जतन केले जात आहे. त्यातीलच एक परंपरेने साजरा होणारा सण म्हणजे वाघबारशी. आबलोलीत हा दिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. -दरवर्षी कार्तिक द्वादशीला गावातील शेतकरी-गुराखी बांधव हा उत्सव साजरा करतात. या उत्सवात, खेळात तरुणांचा सहभाग मोठा असतो. कडेकपारीत वसलेले आपले शेतकरी-गुराखी रानावनातून शेती करतात, गुरे चारतात अशावेळी त्यांच्या रक्षणाची जबाबदारी जंगलातील जांगलदेवाकडे असते. शेतकऱ्यांकडे असणारी दुभती जनावरे, शेतीकामाकरिता लागणारे बैल, रेडे हे चरुन झाल्यावर एका विशिष्ट ठिकाणी थांबवून ठेवले जातात. त्या मोकळ्या मैदानाला गोठण असे म्हणतात. येथे गुरे-ढोरे निवांतपणे रवंथ करतात. शेतकरी-गुराखी आपली चटणी भाकरी खातात. जंगलदेवाच्या कृपेनेच सर्व काही सुरळीत चालू असल्याची त्यांची धारणा असते. म्हणूनच या दिवशी गोड खिरीचा नैवेद्य देवाला दाखवतात. तरुणांपैकी एकाला शेपटी लावली जाते. अंगावर पट्टे काढले जातात, मुखवटे परिधान केले जातात आणि प्रतिकात्मक वाघ म्हणून त्याला गावातून, वाडीवस्तीतून पिटाळत गावाबाहेर नेले जाते. त्याच्यावर शेण-मातीचे गोळे फेकले जातात. गावाबाहेर पिटाळताना वाघरु वाघरु असे ओरडतात. त्यानंतर गावाच्या वेशीवर असलेल्या नदीवर सर्वजण जाऊन आंघोळ करतात. जांगलदेवाला खिरीचा नैवेद्य दाखवतात. तो नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण करतात व जांगलदेवाला सर्वांच्या रक्षणाचे साकडे घालतात. संध्याकाळी तुलसी विवाह मोठ्या उत्साहात साजरा होतो. काळ कितीही बदलला तरी अजूनही सहजीवनासाठी नक्कीच पुरक ठरत आहेत.
जुनी परंपरा -आबलोलीतील या प्रथेला हजारो वर्षांची परंपरा आहे आणि ही परंपरा आजही या गावात मोठ्या श्रध्देने जपली जात आहे. आबलोलीत मंगळवारी हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि श्रध्देने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या उत्सवात वृध्दांबरोबरच तरूणांचाही विशेष सहभाग असतो. त्यामुळे दोन्ही पिढ्यांचा मिलाफ या उत्सवात पाहायला मिळतो.

आबलोली (ता. गुहागर) येथे वाघबारशीला तरूणांना शेपूट लावून त्यांना गावाबाहेर पिटाळले जाते. ही परंपरा आजही सुरू आहे.

Web Title: Aabolitish Barashila becomes a young man with tiger ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.