आला रे आला ‘ती’चा गणपती
By Admin | Updated: September 6, 2016 01:09 IST2016-09-06T01:09:17+5:302016-09-06T01:09:17+5:30
नानाविविध साजांनी नटलेल्या गणरायाचे स्वागत ‘ती’च्या हातून होणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.

आला रे आला ‘ती’चा गणपती
पुणे : कलाधिपती, बुद्धीची देवता, सर्जनशीलतेचा मूर्तिमंत आविष्कार अशा नानाविविध साजांनी नटलेल्या गणरायाचे स्वागत ‘ती’च्या हातून होणे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. उत्सवाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात लोकमतने ‘तीच्या गणपती’ची संकल्पना रुजवून पुरोगामित्वाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या गणपतीची वाजतगाजत मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली.
गणेशाची प्रतिष्ठापना आणि पौरोहित्यही विद्याश्री पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील १० दिवस वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर महिला तसेच आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महिलांच्या हस्ते तीच्या गणपतीची आरती करण्यात येईल. या वेळी गणेशोत्सवाला धार्मिक महत्त्व असले, तरीही आपण करीत असलेले काम विधायक पद्धतीने करावे, अशी शपथ उपस्थितांनी घेतली.
नुकत्याच ब्राझील येथे पार पडलेल्या रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. या महिलांच्या यशाला सलाम करून यंदाचा तीचा गणेशोत्सव या महिला खेळाडूंना समर्पित करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून लोकमत सखी मंचातर्फे ‘ती’चा गणपती ही
अनोखी संकल्पना मांडण्यात
आली असून, यंदाही
महिलांच्या पुढाकाराने तीचा गणपती हा सार्वजनिक सोहळा
उत्साहात साजरा केला जात आहे. कृती, निर्मिती आणि संस्कृतीच्या माध्यमातून उत्सव सर्जनशील आणि कृतिशील व्हावा या संकल्पनेच्या आधारावर लोकमततर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दोन वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांनीही महिलांना आरतीचा मान द्यावा, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे सहप्रायोजक रंगवर्षा सारीज, आयवाना स्पा,
ब्यूटी पार्टनर- आयएसएएस,
हेल्थ पार्टनर-बिक्रम योगा,
फिटनेस पार्टनर-फिटनेस मंत्राज् जिम, नॉलेज पार्टनर- अॅपटेक कॉम्प्युटर एज्युकेशन बॅँकिंग अँड
फायनान्स अॅकॅडमी, एंटरटेनमेंट पार्टनर- लीड मीडिया अँड पब्लिसिटी प्रा.लि. हे आहेत.
‘लोकमत’च्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘ती’चा गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. या वेळी एसएनडीटी महाविद्यालयापासून लोकमत कार्यालयापर्यंत ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली होती. नादब्रह्म ढोलताशा ध्वज पथक ट्रस्टच्या वादकांनी अतिशय उत्तम वादन करून उपस्थितांना ठेका धरायला लावला.