भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळली
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: October 17, 2022 21:38 IST2022-10-17T21:37:47+5:302022-10-17T21:38:30+5:30
येथील कळमनुरी रोडवरील सावरखेडा परिसरात भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळून विचित्र अपघात झाला.

भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळली
हिंगोली :
येथील कळमनुरी रोडवरील सावरखेडा परिसरात भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर तर रूग्णवाहिका पोलिसांच्या जीपवर आदळून विचित्र अपघात झाला. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यात पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह रूग्णवाहिकेतील गरोदर महिलेला किरकोळ मार लागला.
हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यासह जीपने कळमनुरीकडे जात होते. पोलिसांच्या जीपच्या मागे रूग्णवाहिका येत होती. दोन्ही वाहने कळमनुरीकडे जात होती. याच वेळी एका टेम्पो चालकाने वाहन भरधाव चालवून रूग्णवाहिकेला जोराची धडक दिली. यामुळे रूग्णवाहिका पुढे पोलिसांच्या वाहनांवर आदळली. यात पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला. तसेच रूग्णवाहिकेतील गरोदर महिलेसही मार लागला. तसेच तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.
जखमी पोलीस निरीक्षक कच्छवे धावले मदतीला
दरम्यान, रूग्णवाहिकेतून एका गरोदर महिलेस नांदेड येथील रूग्णालयात नेले जात होते. मात्र भरधाव टेम्पो रूग्णवाहिकेवर आदळला. यात गरोदर महिलेसही किरकोळ मार लागला. पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांना अपघातात मार लागलेला असतानाही त्यांनी रूग्णवाहिका बोलावून घेतली. त्यांनी कर्मचाऱ्याच्या मदतीने गरोदर महिलेस रूग्णवाहिकेत बसवून नांदेड येथे तत्काळ रूग्णालयात पाठविले.