भुसावळ - भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे महेंद्र बोंडे या ३८ वर्षीय कामगाराचं निधन झालं आहे. धडकेमुळे खाली पडून डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. घरातून कामावर जायला निघालेले महेंद्र यांचा कंपनीत पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की त्यात महेंद्र बोंडे यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला.
महेंद्र बोंडे हे जळगाव औद्योगिक वसाहतीमधील गणेश अल्युमिनियम कंपनीत कामाला होते. दररोज भुसावळ येथून दुचाकीने ते अपडाऊन करायचे. शनिवारी सकाळी कामावर जाताना खेडी फाट्याजवळील अरूंद पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर चालक वाहनासह तिथून पसार झाला. ज्याठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण अरूंद पुलाचे असून आजूबाजूला नाला आहे तसेच काही अंतरावर शेती असल्याने घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही नाहीत. या अपघाताचे फुटेज मिळणे अवघड असले तरी हे धडक देणारे वाहन ट्रक असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकलुता एक आधार गेला
महेंद्र बोंडे यांच्या आई वडिलांचे बायपास झालेले असून त्यांना मधुमेह आणि इतरही व्याधी आहेत. वृद्ध आई वडिलांचे महेंद्र हे एकुलता एक आधार होते. कंपनीत काम करून मिळणाऱ्या पगारावर ते आजारी आई वडिलांचा सांभाळ करण्यासह त्यांचा उपचारही करत होते. मात्र आता या अपघाताने आई वडिलांचा आधार हिरावला आहे. वृत्त समजताच कंपनी मालकासह कामगारांनी रूग्णालयात धाव घेतली.
मेरे लिये क्या मांगा...
अपघाताच्या एक दिवस अगोदरच शुक्रवारी संध्याकाळी कंपनीतील सहकारी युनूस पठाण हे नमाज पठण करून आल्यानंतर महेंद्र यांनी मेरे लिये क्या मांगा...असा प्रश्न केला होता. त्यावेळी तेरे लिये दुवाँ मांगी असं उत्तर पठाण यांनी दिले होते. हे क्षण आठवत पठाण यांचा कंठ दाटून आला होता.