वारक-यांसाठी ९६ हजार लिटर केरोसिन कोटा

By Admin | Updated: July 11, 2016 14:39 IST2016-07-11T14:38:28+5:302016-07-11T14:39:29+5:30

आषाढी यात्रा कालावधीत येणा-या वारक-यांसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ९६ हजार लिटर केरोसिन कोटा उपलब्ध करण्यात आला आहे

96 thousand liters of kerosene quota for the Warkar | वारक-यांसाठी ९६ हजार लिटर केरोसिन कोटा

वारक-यांसाठी ९६ हजार लिटर केरोसिन कोटा

dir="ltr">
आषाढी यात्रा : ४४ हॉकर्सद्वारे वितरण, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके
- मोहन डावरे
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. ११ - आषाढी यात्रा कालावधीत येणा-या वारक-यांसाठी जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने ९६ हजार लिटर केरोसिन कोटा उपलब्ध करण्यात आला आहे. यात्रा कालावधीत पालख्यांनी तालुक्यात प्रवेश केल्यानंतर ४४ हॉकर्सद्वारे या केरोसिनचे वितरण करण्यात येणार आहे. काळाबाजार रोखण्यासाठी मंडल अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सामाजिक संघटनांचीही यासाठी मदत घेण्यात येत आहे.
आषाढी यात्रा सोहळा हा पंढरपुरात भरणाºया प्रमुख यात्रा सोहळ्यांपैकी सर्वात मोठा यात्रा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, गोवा आदी राज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक, दिंड्या, पालख्या येत असतात. या दिंड्यांचे वास्तव्य चंद्रभागा परिसर, पंढरपूरच्या आजूबाजूचा परिसर, ६५ एकर पालखी तळावर असते. या ठिकाणी मुक्कामासाठी असलेल्या भाविकांची स्वयंपाकाची सोय व्हावी, यासाठी प्रत्येक वर्षी पुरवठा विभागातर्फे त्यांना अल्पदरात केरोसिनचा पुरवठा केला जातो. 
मागील दोन महिन्यांपासून पुरवठा विभागाने केरोसिनचा कोटा कमी केल्याच्या निषेधार्थ केरोसिन विक्रेते व महसूल प्रशासन असा वाद सुरू होता. गॅसचे कनेक्शन वाढल्याच्या निकषानुसार पुरवठा विभागाने पंढरपूर शहर व तालुक्यातील केरोसिनचा कोटा कमी केला होता. यात्रा कालावधीतही मागील वर्षीपेक्षा कमी कोटा मिळेल, या भीतीने विक्रेत्यांनी आक्रमक होत राजीनाम्याचे अस्त्र उगारले होते. त्यामुळे विक्रेत्यांविरुद्ध प्रशासन असा संघर्ष यात्रा कालावधीत होतो की काय? अशी स्थिती असताना महसूल प्रशासन व विक्रेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत आषाढीत केरोसिन विक्री करण्याचा निर्णय घेतला.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही ९६ हजार लिटर केरोसिनचा कोटा पुरवठा विभागाने उपलब्ध केला आहे. या केरोसिनचे वितरण सर्व संतांच्या पालख्यांनी पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्यानंतर पिराची कुरोली पालखीतळ, भंडीशेगाव पालखीतळ, वाखरी पालखीतळ, पंढरपूर शहर, चंद्रभागा मैदान, ६५ एकर पालखीतळ व शहरातील प्रमुख मठांच्या परिसरात या केरोसिनचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ४४ हॉकर्सची नेमणूक करण्यात आली असून, प्रयेक हॉकर्सला दररोज २०० लिटर केरोसिन देण्यात येणार आहे. त्याचे वितरण सुलभ व तक्रारविरहित व्हावे, यासाठी महसूल प्रशासनाने प्रत्येक हॉकर्सला एक अधिकारी देखरेखीसाठी दिला आहे.
यात्रा कालावधीत केरोसिनचा काळाबाजार रोखण्यासाठी नायब तहसीलदार, मंडल अधिकारी दर्जाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, कोतवाल, सामाजिक, भ्रष्टाचारविरोधी संघटनांचे पदाधिकारी यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांच्याद्वारे केरोसिन विक्रीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. यात्रा काळात काळाबाजार करणाºया केरोसिन विक्रेत्यांवर परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे केरोसिनच्या काळाबाजाराला चाप बसणार आहे.
 
माणशी एक लिटर केरोसिन
यात्रा कालावधीत  दिंडीत असणाºया भाविकांच्या संख्येनुसार माणसी एक लिटरप्रमाणे केरोसिन त्या दिंडीला देण्यात येणार आहे. त्याची किंमत प्रतिलिटर १५.८० पैसे अशी अल्प ठेवण्यात आली असून, यापेक्षा जास्त रक्कम कोण विक्रेते मागत असतील तर त्यांनी महसूल प्रशासन, तहसीलदार, पुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.
 
केरोसिन विक्रीत समन्वय हवा
- आषाढी यात्रा कालावधीसाठी ९६ हजार लिटर केरोसिनचा कोटा उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षीचा केरोसिन विक्रीचा अनुभव लक्षात घेता अधिकारी व काही विक्रेते यांच्या संगनमताने भाविकांना केरोसिन न देता पेट्रोलपंप, चारचाकी गाड्या, इंजिनचालक आदींसाठी केरोसिनचा कोटा वळविण्याचा घाट घातला जातो. अधिकाºयांचेही त्याकडे दुर्लक्ष असते. ही बाब निंदनीय असून, भाविकांसाठी आलेला केरोसिनचा कोटा इतरत्र न वळविता तो वारकºयांनाच अल्पदरात विकला जावा, यासाठी केरोसिन विक्रेते, महसूल प्रशासन अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्यामध्ये योग्य समन्वय हवा, तरच केरोसिनची विक्री योग्य पद्धतीने होणार आहे.
 
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी ९६ हजार लिटर केरोसिनचा कोटा उपलब्ध आहे. त्याचे वितरण गरजू वारकºयांपर्यंत पोहोचावे यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. ४४ हॉकर्सची नेमणूक करण्यात आली आहे. काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. तरीही त्यामध्ये गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. तसे प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. 
- जे. के. व्हनखंडे, पुरवठा अधिकारी, पंढरपूर

Web Title: 96 thousand liters of kerosene quota for the Warkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.