मुंबई - राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला जोरदार विरोध झाला. याच विरोधातून राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेत त्रिभाषा समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. आज सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी ते पोहचले होते. या भेटीनंतर नरेंद्र जाधव यांनी मोठी माहिती समोर आणली. राज्यातील ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला ठाम विरोध असल्याचं जाधव यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, त्रिभाषा समितीच्या कामाबाबत राज ठाकरे समाधानी आहे. आज त्यांना भेटून हिंदी भाषेबाबत त्यांचे मत आम्ही विचारले. त्यावेळी त्यांनी ठामपणे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून चालू शकेल, परंतु पहिली ते चौथी कुठल्याही प्रकारे हिंदीची भाषेची सक्ती असता कामा नये. पाचवीपासून पुढे हिंदी भाषा असली तरी चालेल परंतु ती ऐच्छिक स्वरुपात असायला हवी. त्याला पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. त्याबाबत आम्ही नोंद घेतली आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या समितीला जो कालावधी देण्यात आला आहे तो ५ डिसेंबरपर्यंतचा आहे. मात्र २-३ डिसेंबरपर्यंत आमचा दौरा सुरू आहे. त्यामुळे ५ डिसेंबरला अहवाल देणे अशक्य आहे. जास्तीत जास्त २० डिसेंबरपर्यंत आम्ही आमचा अहवाल शासनाला सादर करू. सर्व विद्यार्थ्यांचे अंतिम हित लक्षात घेऊन हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. साधारणपणे ९० ते ९५ टक्के लोकांना पाचवीपासून हिंदी हवी. ९५ टक्के लोकांचा ठाम आग्रह आहे की हिंदी भाषा लादता कामा नये. पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची नको असं त्यांनी म्हटल्याचे नरेंद्र जाधव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आमच्या त्रिभाषा धोरण समितीने पहिल्याच बैठकीत ठरवले होते, संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन लोकांच्या भावना, जनमत काय आहे हे समजून घ्यायचे. आम्ही ८ ठिकाणी जायचे ठरवले. त्यातील ३ ठिकाणे झाली आहे. १० ऑक्टोबरला नागपूरला होतो, ३१ ऑक्टोबरला रत्नागिरी, १ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे होतो. आता ११ नोव्हेंबरला नाशिक, १३ नोव्हेंबरला पुण्यात त्यानंतर सोलापूर असं विविध ठिकाणी जाऊन शेवटी मुंबईत येणार आहोत. समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी बोलून त्यांची मते जाणून घ्यायची आहे. त्यासाठी आम्ही ४ प्रश्नावली तयार केली आहेत. tribhashasamiti.mahait.org अशी वेबसाईट बनवली आहे. त्यावर जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय द्यावा असे आवाहन नरेंद्र जाधव यांनी केले आहे.
Web Summary : Narendra Jadhav met Raj Thackeray, revealing 95% oppose Hindi imposition from grades 1-4. Hindi should be optional from fifth grade, he added. Report due by December 20, prioritizing student welfare.
Web Summary : नरेंद्र जाधव ने राज ठाकरे से मुलाकात की, जिसमें खुलासा हुआ कि 95% लोग कक्षा 1-4 से हिंदी थोपने का विरोध करते हैं। उन्होंने कहा कि पांचवीं कक्षा से हिंदी वैकल्पिक होनी चाहिए। रिपोर्ट 20 दिसंबर तक, छात्रों के कल्याण को प्राथमिकता।