पहिल्या दिवशी भरले ९ हजार अर्ज
By Admin | Updated: May 17, 2016 01:46 IST2016-05-17T01:46:01+5:302016-05-17T01:46:01+5:30
आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ९ हजार २२२ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरून त्याची प्रिंट आऊट काढली आहे.

पहिल्या दिवशी भरले ९ हजार अर्ज
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ९ हजार २२२ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरून त्याची प्रिंट आऊट काढली आहे. पुणे विभागातर्फे सुमारे ७३ हजार जागांसाठी ही प्रवेश प्रकिया राबविली जात असून, सोमवारी २१ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लॉगइन केले आहे.
पुणे विभागाच्या सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘काही शाळांनी विद्यार्थी व पालकांची बैठक घेऊन सोमवारऐवजी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज भरण्यासाठी पुरेसा अवधी असल्याने शाळांनी नियोजन करून वेळेत सर्वांचे अर्ज भरावेत, अशा सूचना सर्व मुख्यध्यापकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही घाई न करता विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अर्ज भरावेत.
>पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व अकरवी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीतर्फे अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला.
>शहरातील सर्व शाळांनी सोमवारपासून आॅनलाईन अर्ज भरून घेणे अपेक्षित होते. मात्र, शहरातील काही शाळांत मंगळवार- बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे. परंतु, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अनेक शाळांमधील शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी अर्ज भरले.