अपर आदिवासी आयुक्तांकडून रोख ९२.७५ लाख जप्त

By Admin | Updated: July 20, 2014 01:15 IST2014-07-20T01:15:26+5:302014-07-20T01:15:26+5:30

२५ हजार रूपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेले अपर आदिवासी आयुक्त भास्कर वाळिंबे यांच्या अमरावती आणि ठाणे येथील निवासस्थानांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

9 2.75 lakh cash seized from Additional Tribal Commissioner | अपर आदिवासी आयुक्तांकडून रोख ९२.७५ लाख जप्त

अपर आदिवासी आयुक्तांकडून रोख ९२.७५ लाख जप्त

एसीबी पथकाची कारवाई : अमरावती, ठाण्यातील घरांची झडती
अमरावती : २५ हजार रूपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेले अपर आदिवासी आयुक्त भास्कर वाळिंबे यांच्या अमरावती आणि ठाणे येथील निवासस्थानांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) धाडी घालून ९२.७५ लाख रूपयांची रोकड जप्त केली. कारवाईदरम्यान चार ते पाच चारचाकी वाहने तसेच काही दुचाकीदेखील जप्त केल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील नारायण म्हात्रे या इमारत मालकाला इमारतीचे थकीत देयक काढून देण्याकरिता वाळिंबे यांनी कनिष्ठ लिपिकामार्फत २५ हजारांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना शुक्रवारी एसीबीच्या पथकाने वाळिंबे यांना रंगेहात पकडले होते. त्यानंतर शनिवारी या पथकाने वाळिंबे यांच्या अमरावती शहरातील विसावा कॉलनीतील घराची झडती घेऊन रोख २१ लाख ७५ हजार रूपये जप्त केले. याचवेळी दुसऱ्या पथकाने त्यांच्या ठाणे येथील दुसऱ्या फ्लॅटची झडती घेतली. तेथून तब्बल ७१ लाखांची रोकड जप्त केली आहे. पथकातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळिंबे यांच्या घरांवर टाकलेल्या धाडीदरम्यान चार ते पाच चारचाकी वाहने आणि तितक्याच इंपोर्टेड दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, त्यांना न्यायालयात सादर करण्यात आल्यावर २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सोमवारी लॉकर, बँक खात्यांची तपासणी
वाळिंबे यांच्या दोन्ही घरांमधून लाखोंची रोकड जप्त केल्यानंतर सोमवारी त्यांच्या बँक खात्यांची आणि लॉकर्सची तपासणी केली जाईल.
वाळिंबे यांची पत्नी आणि दोन मुलांच्या नावे असलेल्या बँक खात्यांची तपासणीदेखील यावेळी केली जाईल. (प्रतिनिधी)

Web Title: 9 2.75 lakh cash seized from Additional Tribal Commissioner